
सामना प्रतिनिधी। वडीगोद्री
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे दरोडेखोरांनी दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकला असून तिसऱ्या ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न मात्र फसला. यादरम्यान, गोंदी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन दरोडेखोरांवर दोन गोळ्या झाडल्या. मात्र, दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
वडीगोद्री येथे दरोडेखोरांनी रात्री दीडच्या सुमारास सुरेश बाबासाहेब काळे यांच्या घराचे कुलूप तोडले. त्यानंतर तिसरे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत असताना काळे यांना जाग आली. त्यानंतर
त्यांनी आरडा-ओरडा केल्यामुळे दरोडेखोरांनी तिथून पळ काढला. नंतर २ वाजेच्या सुमारास गावातील बाबुराव भोसले यांच्या घराचा पाठीमागचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला त्यांचा मुलगा राम झोपलेल्या खोलीचे दरवाजे दरोडेखारांनी तोडले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून २२ हजारांची रोकड आणि राम यांच्या हातातील दोन अंगठ्या तसेच घरातील महिलेंचे कानातील-गळयातील सोने असा एक लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. त्यांनतर ३ च्या सुमारास संभाजीनगर-बीड महामार्गालगत असलेले गुरुदेव कॉलनीत पत्रकार राजु छल्लारे यांच्या घराकडे दरोडेखोरांनी मोर्चा वळवला. पण घरासमोर सीसीटीव्ही बसवले आहे. यामुळे दरोडेखोरांनी घराच्या पाठीमागे असलेल्या लोखंडी गेटचे कुलूप तोडले व घरातल्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवत कपाटाच्या चाव्या मागितल्या.. तेथून तीस हजार रुपयांचा ऐवज घरातील महिलांच्या गळ्यातील कानातील तसेच कपाटयातील सोन्या चांदीचे दागिने असा एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
तेथून दरोडेखोर बलेरो गाडीतून पाचोडकडे पलायन करत असतानाच या घटनेची माहिती पोलीसांना कळाली. गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांच्यासह अन्य काही नागरिकांसोबत संभाजीनगर-बीड राष्ट्रीय महामार्गावर त्या दरोडेखोरांचा सिनेस्टाईल
पाठलाग केला. वारे यांनी दरोडेखोरांचा पाठलाग करताना दोन राऊंड फायर केले. मात्र दरोडेखोर फरार होण्यात यशस्वी झाले.
त्यानंतर दरोडेखोरांचा माग शोधण्यासाठी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पण त्यांनाही माग सापडला नाही. दरम्यान दरोड्याच्या या घटनेदरम्यानच १.३० च्या सुमारास गुंडेवाडी येथून बाबासाहेब महादेव वायसे यांच्या गोठयातुन दोन बैल तीन गायी तसेच तीन वासरे चोरीला गेल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
summary…decoits in jalna































































