
सामना प्रतिनिधी । मालवण
चिंदर भगवंतगड-भटवाडी परिसरात गेले काही दिवस बिबट्यांचा वावर वाढला असून पाळीव जनावरांना या बिबट्यांनी लक्ष केले आहे. अनेक ग्रामस्थांना दिवसाही या बिबट्यांचे दर्शन होत आहे. मंगळवारी सायंकाळी चरावयास गेलेल्या ग्रामस्थांच्या बकऱ्यांचा फडशा बिबट्यांनी पाडल्याने गावात भीतीचे अधिकच वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान वनविभागाने तातडीने याची दखल घेत बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी चिंदर ग्रामस्थांमधून केली जात आहे. चिंदर येथे दिवसाही दोन ते तीन बिबट्यांचे दर्शन ग्रामस्थांना झाले आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या बिबट्यांनी नेहमी वर्दळ असलेल्या आचरा भगवंत गड रस्त्यावरच बैठक मारल्याने काही वाहन चालकांची भंबेरी उडाली होती. श्रीमती प्रतिभा मालवणकर यांना शासकीय योजनेतून मिळालेल्या शेळ्या घेऊन विनोद लब्दे, दिवाकर लाड हे मंगळवारी संध्याकाळी भगवंत गड रस्त्यालगत असलेल्या माळगांवकर यांच्या बागे नजीकच्या डोंगराळ भागात चरावयास घेऊन गेले होते. त्यावेळी कळपातील एका बकरीवर झडप घालत बिबट्याने त्याला ओढत जंगलात नेले. बिबट्यांनी हल्ला केल्याचं समजताच लब्दे आणि लाड यांनी आरडाओरड केल्यावर लगत शेतात काम करीत असलेले प्रविन लब्दे, निलेश चेंदवणकर, महेश कामतेकर आदींनी धाव घेतली पण तोपर्यंत बिबट्यांनी बकऱ्याला ओढत दाट जंगलात नेले. काही ठिकाणी बकऱ्याचे केस दगडावर चिकटलेले आढळून आले. घनदाट झाडी आणि खडकाळ जागेमुळे बकऱ्याचा शोध घेणं धोकादायक बनले होते. मालवणकर यांचे सुमारे पंधरा हजारांच्या आसपास नुकसान झाले. या बाबत मालवणकर यांनी चिंदर ग्रामपंचायत आणि वनविभागाकडे तक्रार दिली आहे.
वनविभागाचे दुर्लक्ष
चिंदर भागात बिबट्याचा वावर दिसून येत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य समीर लबदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र वनधिकारी चिंदर गावात फिरकलेच नाहीत, असा आरोप लब्दे यांनी करताना तात्काळ बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे.





























































