
सामना ऑनलाईन, मुंबई
तानसा पाइपलाइन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलेच फैलावर घेतले. तानसा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा, शासनाला त्यांचे पुनर्वसन करता येत नसेल तर अशा बेघर झालेल्या रहिवाशांना भाडे द्या, तोपर्यंत त्यांच्या झोपडय़ांवर कारवाई करू नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तानसा पाइपलाइनलगत असलेल्या झोपडय़ा तोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले होते. याप्रकरणी पालिका प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेत अनेक झोपडय़ा जमीनदोस्त केल्या. प्रकल्पग्रस्त रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात यावे, असे आदेशही खंडपीठाने दिले होते. परंतु राज्य सरकारकडून या प्रकल्पग्रस्तांचे माहूल येथे पुनर्वसन करण्यात येणार असल्याने रहिवाशांनी त्यास विरोध दर्शवला आहे. घरांवर कारवाई करूनही अद्याप प्रकल्पग्रस्तांचे राज्य सरकारकडून पुनर्वसन करण्यात आलेले नाही. यावरून न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने सरकारला खडसावले. बेघर झालेल्या लोकांना राज्य सरकार घर देऊ शकत नसेल तर प्रकल्पग्रस्तांना भाडे तरी द्या, जेणेकरून ते स्वतः राहण्यासाठी घर शोधू शकतील, असे फटकारत हायकोर्टाने याबाबतची सुनावणी १ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.



























































