
सामना ऑनलाईन, अहमदाबाद
२००२ सालच्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील फरारी आरोपी याहय़ा अब्दुल रेहमान शेख याला गुजरात येथील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संभाजीनगर येथून अटक केली. दुसऱया एका खटल्याशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी गुजरात एटीएसची ही टीम संभाजीनगर येथे आली होती. त्यावेळी शेख याला केवळ संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र चौकशीदरम्यान तो घाटकोपर येथे बेस्ट बसमध्ये २००२ साली झालेल्या स्फोटात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने गुजरात एटीएसने त्याला ताब्यात घेतले. शेखविरुद्ध गुजरात येथे कोणताही गुन्हा नोंद नसल्याने गुजरात एटीएसने त्याला राज्य पोलिसांच्या ताब्यात दिले.
घाटकोपर बॉम्बस्फोटप्रकरणी शेख याच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेबरोबरच ‘पोटा’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन नंतर त्याच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. मात्र स्फोट झाल्यानंतर लगेचच तो सौदी अरेबियातील रियाध येथे पळून गेल्याने त्याला अटक करण्यात आली नव्हती. अखेर आज तब्बल १६ वर्षांनंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.



























































