
सामना ऑनलाईन । देहरादून
उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्यात अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. या पावसामुळे पिथौरागड जिल्ह्यात जिम्बा नदीवरील पूल कोसळला. त्यानंतर पलीकडे जाण्यासाठी स्थानिकांनी रोप वे बनवला. या रोप वे वरून प्रवास करत एक शिक्षक दरोरज नदी पार करतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रवास करत हा शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी हा शिक्षक दररोज तारेवरची कसरत करत आहे. याबाबतचा व्हिडिओ नुकसात व्हायरल झाला आहे. त्यात तो शिक्षक रोप वेच्या मदतीने नदी पार करताना दिसत आहे.
अतीवृष्टीमुळे उत्तराखंड राज्यात अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी हा शिक्षक सुमारे ३० मीटरची नदी जीवावर उदार होऊन पार करतो. विद्यार्थ्यांना शिकवून परत रोप वेने नदी पार करत घर गाठतो. अतीवृष्टीमुळे जिम्बा नदीवरील पूल कोसळला होता. प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे स्थानिकांनीच रोप वे बांधला. त्याचा वापर करत शिक्षक ही नदी रोज पार करत आहे.
























































