
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने संपूर्ण पंढरपूर शहर आणि तालुका कडकडीत बंद पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजातील तरुणांनी ठिय्या मारून आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, मंदिर परिसर तसेच शहरातील प्रमुख रस्त्यावरील दुकाने बंद होती. चहाची टपरी देखील उघडी नसल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले. दक्षता म्हणून प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे. तोडफोड होऊ नये यासाठी एस टी महामंडळाने बस सेवा बंद ठेवली आहे. पंढरपूर शहराकडे येणारे रस्ते आंदोलकांनी रोखून धरल्याने खाजगी वाहतूक ठप्प आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी २०० एसआरपीची जादा कुमक बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आली आहे. बंद शांततेत पार पाडण्यासाठी सकल मराठा समाजाचे तरुण प्रयन्तशील आहेत.































































