
सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा
आखिल भारतीय किसान सभा आणि आखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गुरूवार क्रांती दिनी उरण तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
आपल्या जमिनी आपल्या नावे करणे, शेतीमालाला दिडपट भाव मिळणे, संपूर्ण कर्ज मुक्ती झाली पाहिजे, शेतमालाच्या उत्पादन खर्च कमी करण्यासाठी स्वस्त दरात बी-बियाणे, खते, औजारे, किटक नाशके वैगेरे उपलब्ध करून देणे, स्वामिनाथन आयोगाच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या शिफारशींची अंमल बजावणी करणे, सर्व शेतकरी व शेत मजूर यांना वयाच्या ६० वर्षा नंतर पेन्शन योजना सूरू करावी, सर्व शेतकऱ्यांचे पीकविमा योजनेचे अर्ज भरून घेणे, सिडको, एमएमआरडीए, नैना, खोपटे नवे शहर अंतर्गत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील सर्व गावातील घरे अधिकृत गावठाण म्हणून जाहिर करणे, खाडी किनाऱ्यावरील बांध बंधिस्तीचे मजबूतीकरण करणे, समुद्राच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्यांना एकरी १० हजार नुकसान भरपाई देणे या सारख्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मागण्यांचे निवेदन उरणच्या तहसिलदार कल्पना गोडे यांना देण्यात आले. कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सामिल झाले होते.
summary…kisan sabha morcha at raigadh





























































