
सामना प्रतिनिधी, मुंबई
रग्बी विश्वचषक २०१९चा करंडक सध्या हिंदुस्थान भेटीवर असून मुंबईत त्याचे शानदार स्वागत करण्यात आले. बॉम्बे जिमखाना येथे आयोजित या विश्वचषकाच्या स्वागत समारंभात रग्बी इंडियाचे सरचिटणीस महेश मथाई यांनी रग्बी विश्वचषकाच्या आयोजनासाठी निवडलेल्या १८ देशांमध्ये हिंदुस्थानचाही समावेश असल्याचे सांगून रग्बी हा खेळ देशात लोकप्रिय करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी वर्ल्ड रग्बीचे सीईओ ब्रेट गॉस्पर, एशिया रग्बीचे अध्यक्ष आगा हुसेन, रग्बी इंडियाचे सहसचिव निर्माते-अभिनेते राहुल बोस, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हे उपस्थित होते.
हिंदुस्थानात रग्बी या खेळला चालना देण्यासोबतच २०१९मध्ये जपानमध्ये होणाऱ्या रग्बी विश्वचषकाची वातावरणनिर्मिती करण्याच्या उद्देशाने रग्बीचा हा विश्वचषक विविध देशांमध्ये नेण्यात येत आहे. सध्या या विश्वचषकाचे हिंदुस्थानात जल्लोषात स्वागत होत असून दिल्ली, मुंबई, भुवनेश्वर आदी ठिकाणी हा विश्वचषक नेण्यात येणार आहे.
२० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत जपानमध्ये रग्बी विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. यावेळी पहिल्यांदाच आशिया खंडात रग्बी विश्वचषक पार पडणार असून त्याचा बहुमान जपान देशाला मिळत आहे. या विश्वचषकात जगातील २० सर्वोत्तम संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत.




























































