
सामना प्रतिनिधी । मुंबई
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) रिफायनरीतील हायड्रोजन क्रॅकर प्लांटमध्ये बुधवारी दुपारी लागलेली आग अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे विझली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी दर आठ-पंधरा दिवसांनी होणारी वायुगळती, तेलगळती यामुळे येथे जितके प्रदूषण आहे तितकाच येथील दुर्घटनांचा धोका कायम आहे. भरलोकवस्तीत असलेल्या रिफायनरीमुळे संपूर्ण माहुलगावच तेलसाठय़ांच्या बॉम्बवर आहे. माहुल परिसरात बीपीसीएलची रिफायनरी, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी, टाटाचा प्लांट, नाफ्थाच्या ऑइलच्या टाक्या असे सगळे ज्वलनशील पदार्थांचे प्लांट आहेत. या प्लांटच्या आजूबाजूलाच गव्हाणपाडा झोपडपट्टी, विष्णू नगर झोपडपट्टी, पालिकेच्या कामगारांच्या वसाहती, प्रकल्पबाधितांची घरे आहेत.
युनिट फेल्युअर?
दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी कंपनीतर्फे समिती नेमण्यात येणार आहे. तब्बल ७२ टन इंधन संपल्यानंतर रात्री ही आग आटोक्यात आली तर बुधवारची दुर्घटना ही युनिट फेल्युअरमुळे झाल्याची चर्चा या परिसरात होती. दरम्यान, गुरुवारी कंपनीचे काम नेहमीप्रमाणे सुरू होते. तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यास कोणतीही बाधा आलेली नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यार, बुधवारी रात्रीच्या सुमारास बाजूलाच असलेल्या एचपीसीएलच्या प्लांटमधूनही तेलगळती होऊ लागली होती. गव्हाणगाव साईनाथ चौक येथे ही गळती कर्मचाऱ्यांनी दुरुस्त केली.
पाच जण आयसीयूमध्ये
या आगीत ४५ कामगार जखमी झाले असून त्यापैकी २२ जणांना बुधवारीच उपचार करून सोडून देण्यात आले होते तर गुरुवारी आणखी सहा जणांना उपचार करून सोडून दिले. १२ जणांची प्रकृती स्थिर असून उर्वरित पाच जण आयसीयूमध्ये दाखल आहेत. भूषण पंडित, सरबजीत मंडल, सुशील भोसले, कृष्णमूर्ती, नंदादीप वाळवे अशी या पाच जणांची नावे आहेत.
शिवसेनेने जागे करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
बीपीसीएलची दुर्घटना ज्या ठिकाणी घडली त्याच्या अगदी जवळ एचपीसीएलचा रिफायनरी प्लांट असून या प्लांटच्या विस्तारीकरणाचे काम कंपनीने हाती घेतले आहे, मात्र अनधिकृतपणे पालिकेची रस्त्याची जागा बळकावून हा प्लांट उभारला गेला असून या प्लांटसाठी कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत अशी गंभीर बाब पुढे आली आहे. शिवसेना नगरसेविका निधी शिंदे यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कंपनीने प्लांट उभारण्याचे काम सुरूच ठेवले आहे.
माहुलगाव येथील प्रभाग क्रमांक १४८ मधील भूखंड क्रमांक ३८२ वर एचपीसीएलच्या विस्तारित भूखंडाचे काम सुरू आहे, मात्र हे काम अनधिकृतपणे सुरू असल्याबद्दल शिवसेनेने सर्वात प्रथम आवाज उठवला होता. प्रभाग समिती अध्यक्षा निधी शिंदे यांनी या अनधिकृत कामाबाबत पालिका आयुक्तांना पत्र लिहिले होते व सभागृहातही हरकतीचा मुद्दा उपस्थित केला, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निधी शिंदे यांनी केला आहे.
कुठल्याही परवानग्या नाहीत
या प्लांटला केवळ लेआऊटसठी परवानग्या देण्यात आल्या होत्या. त्यात मलनिस्सारण वाहिन्या आणि अन्य पायाभूत सुविधा उभारणे अपेक्षित आहे. त्यानंतर उर्वरित परवानग्या कंपनीने मिळवायच्या आहेत. मात्र कंपनीने जागा तर अडवली आहेच वर बांधकामही सुरू केल्याचा आरोप विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी केला.
गेल्या वर्षी ६ मे रोजी या बांधकामाबाबत मी एम-पूर्वच्या सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने कंपनीला स्टॉप वर्कची नोटीस दिली होती, मात्र तरीही या प्लांटचे काम सुरू असून तळमजला अधिक तीन मजल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.
- निधी शिंदे, प्रभाग समिती अध्यक्षा



























































