
सामना प्रतिनिधी । मुंबई
पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्ध नागरिकांचे दागिने चोरून पळणारा सराईत तोतया पोलीस पुन्हा एकदा सापडला. राजेश बापर्डेकर (४८) असे त्याचे नाव असून तो सध्या जामिनावर बाहेर होता. रस्त्याने जाणाऱया ज्येष्ठ नागरिकांना थांबवायचे. स्वतःची ओळख पोलीस असल्याची सांगायची आणि बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुटायचे अशा प्रकारचे राजेशविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या शनिवारी राजेश सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळ येणार असल्याची खबर क्राइम ब्रँच युनिट-१चे अंमलदार सावंत व चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ठाकूर, शिंदे, पवार व पथकाने सेंट जॉर्ज हॉस्पिटल परिसरात सापळा रचून राजेशला पकडले. त्याच्याकडून चोरलेले एक लाख रुपये किमतीचे ४८ ग्रॅम सोने हस्तगत केले.






















































