
सामना ऑनलाईन । गोवंडी
गोवंडी येथील संजय नगर इथल्या मनपा शाळेत २००हून जास्त मुलांना विषबाधा झाल्याचं समोर येत आहे. येथील उर्दू माध्यमातील शाळेत दिल्या जाणाऱ्या औषधामुळे या मुलांना विषबाधा झाल्याचं समोर येत आहे. या घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून चांदनी साहिल शेख (१२) असं या दुर्दैवी मुलीचं नाव आहे. १७३ विषबाधित विद्यार्थ्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, ५५ विद्यार्थी शताब्दी रुग्णालयात दाखल आहेत.
चांदनी ही बीएमसी शाळा क्र. ४ बैंगनवाडी येथील शाळेत होती. उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तिला त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे तिला मृत घोषित केलं. तिच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, चांदनी सोमवारी शाळेत दिल्या गेलेल्या औषधी गोळ्या घेतल्यापासूनच आजारी होती. या गोळ्या फॉलिक अॅसिड आणि अॅलबेनडोझोल आयपी ४०० या होत्या. पोलिसांनी या गोळ्यांचे नमुने जप्त केले आहेत.




























































