
सामना प्रतिनिधी । कासार सिरसी
कासार सिरसी पोलिसांनी छापा टाकून चोरीच्या ८ मोटारसायकली जप्त केल्याची घटना घडली.
निलंगा तालुक्यातील मौजे कोराळी येथे चोरीच्या मोटारसायकली असल्याची गुप्त माहिती कासार सिरसी पोलिसांना मिळाल्याने कासार सिरसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी पथक तयार करून कोराळी येथील लखन ममाळे यांच्या घरावर छापा टाकला असता ममाळे यांच्या घरासमोरील अंगणात व परिसरात कागदपत्र व नंबरप्लेट नसलेल्या चोरीच्या ८ मोटार सायकली आढळून आल्या. या मोटारसायकली पोलिसांनी जप्त करून लखन ममाळे यास ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता विलास वसंतराव बारटके रा.निलंगा यांच्याकडून या गाड्या आणल्याचे त्याने सांगितले. त्या मोटारसायकली कमी किंमतीत विक्री करीत असल्याचेही सांगितले. यावरून पोलिसांनी विलास बारटके यालाही अटक करून कासार सिरसी पोलिसात सदर प्रकरणाची नोंद करून बारटके यास निलंगा पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले.
छापा टाकणारऱ्या पोलीस पथकात सहायक पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, फौजदार समाधान कवडे, काकासाहेब गायकवाड, भीमाशंकर भोसले, विकास भोंग, मोहन जगताप, नकुल पाटील, अस्लम शेख, मन्मंथ धुमाळ यांच्यासह आदीजण सहभागी होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर यांनी भेट देऊन जप्त केलेल्या मोटारसायकलींची पाहणी केली.
या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार समाधान कवडे हे करीत आहेत.





























































