कथानकच मराठी सिनेमाचा हिरो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलाखत | मंगेश दराडे

मराठीत हिंदीसारखे स्टारडमकर सिनेमे चालत नाहीत. आपल्याकडे आजही प्रेक्षक आशयघन सिनेमांनाच पसंती देतात. मराठीत कथानक हाच खरा हीरो असल्याचे स्पष्ट मत अभिनेते सचिन खेडेकर यांनी मांडले.  लककरच  ‘टेक केअर गुड नाईट ’ या सिनेमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा…

‘टेक केअर गुड नाइट’ या आकर्षक शीर्षकावरूनच या सिनेमाविषयीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आतापासूनच वाढली आहे. सिनेमातील भूमिकेविषयी आणि कथानकाविषयी सचिन खेडेकर म्हणाले, हा कौटुंबिक सिनेमा असला तरी त्या माध्यमातून सायबर क्राइमसारखा गंभीर विषय यात हाताळला आहे. यात मी वडिलांची भूमिका साकारतोय. साधारण माझ्या वयाचे अनेक पालक आहेत जे बदलत्या तंत्रज्ञानापासून दूर पळतात, परंतु कुटुंबातील एका घटनेमुळे सन्मान राखण्यासाठी वडिलांवर तंत्रज्ञानाचे धडे गिरवण्याची वेळ येते अशी माझी भूमिका आहे.

मराठी रंगभूमीला अनेक यशस्वी नाटके देणारे गिरीश जोशी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करीत आहेत. गिरीशसोबत मी आजवर अनेकदा काम केले आहे. त्याने दिग्दर्शनात पदार्पण करावे ही माझी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. ती या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झाल्याचे खेडेकर यांनी सांगितले. ‘काकस्पर्श’,  ‘मुरांबा’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ अशा अनेक आशयघन सिनेमांत सचिन खेडेकर यांनी अभिनय केला आहे. सिनेमांच्या निवडीविषयी ते म्हणाले, ‘मुळात मला कथानक आवडायला हवे. कथानक आवडले तरच मी सिनेमा स्वीकारतो. सिनेमात माझी भूमिका मध्यवर्तीच असली पाहिजे असा माझा आग्रह नसतो. ‘कच्चा लिंबू’मध्ये मी केवळ आठच दिवस काम केले होते. चांगला सिनेमा हा प्रेक्षकांच्या मतांमध्ये बदल घडवणारा असला पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, आपल्याकडे सिनेमांची संख्या अधिक असली तरी केवळ दहा टक्के सिनेमेच प्रेक्षकांच्या काळजाला भिडतात. मला त्या दहा टक्के सिनेमांचा भाग व्हायला आवडेल.

बॉलीवूड आणि मराठी सिनेमांतील फरकाविषयी ते सांगतात, बॉलीवूडचे गणित केवळ पैशांभोवती तर मराठी सिनेमांचे कलाकृतीभोवती फिरत असल्याचे खेडेकर सांगतात. एव्हरेस्ट आणि एस. पी. एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमात सचिन खेडेकर यांच्यासह महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे, पर्ण पेठे या कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहे. येत्या ३१ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

यशाचे श्रेय महेशला

‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘काकस्पर्श’, ‘आजचा दिवस माझा’ या सिनेमाच्या यशानंतर सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर ही जोडी पुन्हा एकदा या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. याविषयी ते म्हणाले, महेश माझा चांगला मित्र आणि उत्तम दिग्दर्शक आहे. माझ्या अभिनयाच्या कारकीर्दीत मी ७०च्या आसपास हिंदी आणि जवळपास ३० मराठी सिनेमांत काम केले आहे. मराठी इंडस्ट्रीत माझी जी काही ओळख आहे ती महेशमुळेच. त्याने माझ्यावर विश्वास दाखवल्यानेच मी दर्जेदार मराठी सिनेमांचा भाग होऊ शकलो.

करमणुकीचा नावाखाली काहीही दाखवू नका!

महाराष्ट्रात मराठीला हिंदी सिनेमांशी मोठी स्पर्धा करावी लागते. आपले प्रेक्षक सुजाण आहेत. आजही मराठीत स्टारडमपेक्षा आशयघन सिनेमांची चलती आहे. त्यामुळे प्रेक्षकांना करमणुकीच्या नावाखाली काहीही दाखवून चालणार नाही. मराठी निर्माते किंवा दिग्दर्शकांनी आशयघन सिनेमांची निर्मिती करून करमणुकीचा दर्जा उच्च ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे मतही यानिमित्ताने सचिन खेडेकर यांनी व्यक्त केले.