
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आसाममधल्या नगाव जिल्हय़ात हा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत. ही घटना आठ महिन्यांपूर्वीची आहे. राजेन गोहेन आणि त्या महिलेची ओळख असून त्यांचे त्या महिलेकडे जाणे-येणे होते अशी माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली.
तक्रार आल्यानंतर पोलिसांनी २ ऑगस्टला गुन्हा नोंदवून घेतला आहे. त्याचा तक्रार क्रमांक २५९२-१८ असा आहे. हिंदुस्थानी दंड संहितेनुसार कलम ४१७ (फसवणूक), ३७६ (बलात्कार) आणि ५०६ (धमकी देणे) ही कलमे लावण्यात आली आहेत. पीडित महिलेचा जबाब घेण्यात आला असून तिने वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे. ही घटना घडली तेव्हा महिलेच्या घरी तिचे कुटुंबीय आणि पती नव्हता असे नगावच्या पोलीस उपअधीक्षक संबिता दास यांनी सांगितले.
तक्रार मागे घेण्यासाठी दबाव
बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिला आणि तिच्या पतीवर गोहेन यांच्या समर्थकांनी दबाव आणल्याचाही आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. याप्रकरणी सदर महिलेला धमकी देणाऱया कार्यकर्त्याच्या आवाजाची व्हिडीओ क्लिपही समोर आली आहे.
























































