नीतीशास्त्राची सुलभ मांडणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अशोक अर्धापूरकर

प्रा. सुरेखा मत्सावारांचा कवयित्री म्हणून स्वतंत्र असा परिचय मराठवाडय़ाला आहे. सात कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. ‘लक्ष्मणरेषा’ हा त्यांचा वैचारिक लेखसंग्रह असून त्या गंथाच्या दोन आवृत्त्या निघाल्या आहेत. यावरून त्यांचा पिंड लक्षात येतो. प्रा. सुरेखा मत्सावार नीतिशास्त्राच्या अभ्यासक आहेत. थोर विचारवंत नरहर कुरुंदकर गुरुजींनी त्यांच्या लेखनाची दखल घेतली आहे. अनेक तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे लेखिकेची अभ्यासू वृत्तीही लक्षात आल्यावाचून राहत नाही. तत्त्वज्ञान किंवा नीतिशास्त्र हे विषय सामान्यांच्या आकलनापलीकडचे आहेत. प्रा. सुरेखा मत्सावारांनी काही गृहितकांच्या आधाराने नीतिशास्त्र सामान्य वाचकांसाठी सुलभ केले आहे. सामान्य ज्ञान आणि नीतिशास्त्र, स्वातंत्र्य एक आधार तत्त्व, शिक्षा आणि न्याय, कर्तव्य, धर्म आणि नीती, परमेश्वर जाणलेला आणि जाणवणारा, अमरत्व संकल्पना, अमरत्व संपादन करणारा कर्ता, कर्तव्यासाठी कर्तव्य समाजांतर्गत व्यक्ती, विश्व आणि नैतिकता इ. विषयांवरचे हे टिपणवजा लेखन ‘लक्ष्मणरेषा’त आहे. धकाधकीच्या आणि प्रचंड ताणतणावातही वावरणाऱया समाजाला नीतितत्त्वांचा परिचय दिल्याने सारासार विचार पद्धती दृढ करण्यासाठी ‘लक्ष्मणरेषा’ हा वैचारिक लेखसंग्रह पुरेसा उपयुक्त आहे.

नीतिशास्त्राचा सैद्धांतिक अभ्यास तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा राहील, परंतु सामान्य वाचकांच्या मनात नीतिशास्त्रासंबंधाने जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांना सहज भाषेत समजावून सांगणे तशी अवघड प्रक्रिया आहे. हे खरे असले तरी प्रा. सुरेखा मत्सावारांनी आपल्या भाषेत दैनंदिन जीवन प्रवाहात नीतियुक्त माणूस नव्याने घडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. प्रा. सुरेखा मत्सावारांच्या मते, नीतियुक्त माणसांचा समूह म्हणजे सुजाण समाज असा अभिप्रेत होणारा अर्थ त्यांच्या पहिल्या प्रकरणाचे फलित होय. एका अवघड विषयाची सुलभ मांडणी लेखिकेने लीलया केली आहे.

‘लक्ष्मणरेषा’चे दुसरे प्रकरण आहे ‘स्वातंत्र्य एक आधारतत्त्व’. स्वातंत्र्याला मानवी जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. स्वातंत्र्याचे आधार काय आणि कसे हे या लेखात विस्ताराने आले आहे. ‘लक्ष्मणरेषा’मधील ‘शिक्षा आणि न्याय’ हे प्रकरण मजेशीर आहे. न्यायतत्त्व आणि शिक्षा नीतिशास्त्रानुसार लेखिकेने केलेले विवेचन सहज लक्षात येण्याजोगे आहे. ‘कर्तव्य’ या प्रकरणात लेखिकेने माणूस आणि कर्तव्यसंबंधाने सखोल चिंतन नोंदविले आहे. थोर विचारवंत कान्टच्या मते नैतिक माणूस हा दीपस्तंभाप्रमाणे असतो. अर्थात हे सर्व त्या व्यक्तीच्या कर्तव्यावर अवलंबून असते. मानवी जीवनात कर्तव्याला फार महत्त्वाचे स्थान आहे. कर्तव्यासोबत हक्काचाही प्रश्न निर्माण होतो. नैतिकतेशी निगडित असा हा मुद्दा आहे. ‘लक्ष्मणरेषा’ या पुस्तकात ‘कर्तव्य’ संबंधाने दोन लेख आले आहेत.

प्रकरण नववे ‘कर्तव्य’ जाणीव दृढ करण्यासाठी कान्ट या तत्त्वज्ञानी विचारवंताच्या तत्त्वावर आधारित लेखन आहे. या लेखाच्या माध्यमातून कान्टची विचारधारा वाचकांना सहज लक्षात येऊ शकते. प्रा. सुरेखा मत्सावारांचा ‘धर्म आणि नीती’ हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे. येशू ख्रिस्त, महावीर, गौतम बुद्ध, पैगंबर हे एका एका धर्माचे निर्माते होते. त्यांनी मानवजातीला नैतिक जीवनाचे आदर्श सांगितले, ज्यात सद्गुणाचा अंतर्भाव आहे. दया, शांती, प्रेम या शाश्वत मूल्यांची शिकवण त्यांनी दिली.

‘लक्ष्मणरेषा’ या वैचारिक ग्रंथात परमेश्वर जाणलेला आणि जाणवणारा, अमरत्वाची संकल्पना आणि अमरत्व संपादन करणारा या परस्परपूरक लेखांचा आशय जवळपास सारखाच आहे. तात्त्विक दृष्टय़ा किंवा तार्किकदृष्टय़ा काही फरक संभवतात. धार्मिक विचारधारेत परमेश्वर हे नीतिशास्त्राचे गृहितक मानले जाते. नीतिशास्त्रात परमेश्वराचा विचार आधारभूत तत्त्व म्हणून केला जातो. नीती आणि परमेश्वर, नीती आणि कर्तव्य, नीती आणि अमरत्व यावर लेखिकेने सदर ग्रंथामध्ये मोठय़ा कल्पकतेने मांडणी केली आहे. त्यामुळे अनाकलनीय असे नीतिशास्त्र सराहनीय झाले आहे.

‘लक्ष्मणरेषा’
लेखक : प्रा. सुरेखा मत्सावार
प्रकाशन : चिन्मय प्रकाशन,
मूल्य :११५, पृष्ठ : ११२ रुपये