…आणि आमीर खान माधुरीच्या हातावर थुंकला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आमीर खान आणि माधुरी दीक्षित ही नावं उच्चारली की आपल्या डोळ्यासमोर येतो तो त्यांचा दिल हा चित्रपट. आमीरच्या अनेक फ्लॉप चित्रपटांपैकी एक असलेला दिल छोट्या पडद्यावर मात्र आवर्जून पाहिला जातो. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या एका प्रसंगात आमीर चक्क माधुरीच्या हातावर थुंकला होता. हा प्रसंग नेमका कसा घडला, ते खुद्द माधुरीने नुकतंच सांगितलं आहे.

दिल या चित्रपटातील खंबे जैसी खडी है या गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं. मुळातच खोडकर असलेल्या आमीरला चित्रीकरणावेळी माधुरीची खोड काढायची लहर आली. त्याने तिला आपण हस्तरेषा पाहून भविष्य सांगतो, अशी थाप मारली. त्याच्या थापेला फसलेल्या माधुरीने तिचा हात त्याला बघायला दिला आणि भविष्य सांगायला सांगितलं. आमीरने थोडावेळ तिचा हात निरखून पाहिला आणि अचानक तो तिच्या हातावर थुंकला.

त्याच्या या कृत्यामुळे माधुरी अवाक झाली. नक्की काय झालंय हे कळल्यानंतर चिडलेल्या माधुरीने हातात हॉकी स्टिक घेतली आणि आमीरच्या मागे त्याला मारण्यासाठी पळायला सुरुवात केली. आता माधुरीच्या हातचा मार पडणार या भीतीने आमीरने तिची माफीही मागितली. या प्रसंगात चिडलेल्या माधुरीने आजवरचा हा सर्वात खट्याळ प्रसंग असल्याचं माधुरीने म्हटलं आहे.