एफडीसी’वर बंदी हवीच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

नुकतीच ३४४ औषधांवर केंद्र सरकारच्या एका निर्णयाने बंदी लागू करण्यात येत आहे. गेली ३० हून अधिक वर्षे वापरल्या जाणाऱया या औषधांवर ही बंदी का असावी तसेच आताच हा निर्णय का घेण्यात आला असावा, या प्रश्नांबाबत महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्टस् असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांच्याशी केलेली बातचित.

या निर्णयाचे नेमके स्वरूप काय आहे?
– केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने वेदनाशामक, कफ व खोकल्याच्या काही औषधांसह ३४४ औषधांवर बंदी घातली आहे. हानिकारक असलेल्या या औषधांवर अद्याप बंदी लागू करण्यात आली नाही, मात्र भविष्यात याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. दोन वर्षांपूर्वी ३४४ औषधे ज्यात एकापेक्षा अधिक औषधी संयुगे एकत्र करून फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) बनवलेल्या औषधींना इरॅशनल कॉम्बिनेशन आहेत, म्हणून हिंदुस्थानचे औषधी महानियंत्रक डीसीजीआयद्वारे बंदी घालण्यात आली होती. परंतु त्या बंदीवर त्यावेळी उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली होती जी आजपर्यंत लागू आहे. एफडीसीनिर्मित औषधे औषध कंपन्यांसाठी फायदेशीर असली तरी या औषधांचा वाईट परिणाम रुग्णाच्या आरोग्यावर होताना दिसतो. शरीरातील अकयक निकामी होणे, साइड इफेक्टस्ची शक्यता काढणे असे अनेक दुष्परिणाम दिसतात. या पद्धतीने बनवलेली अनेक औषधे ही अशास्त्राrय स्वरूपाची आहेत. यामुळेच कोणताही विशिष्ट उपयोग किंवा मागणी नसताना दुष्परिणामांची शक्यता वाढवणाऱया एफडीसीवर बंदी आवश्यकच होती.

यात साधारण कोणती आणि किती औषधे आहेत?
– प्रामुख्याने ३४४ औषधांवर बंदी घालण्यात आलेली आहे. यात वेदनाशामक औषधे, सर्दी, खोकला तसेच मधुमेह यावरील औषधे आणि काही प्रतिजैविकांचा समावेश आहे. मुळात आपल्याकडे वेदनाशमन, ताण-नैराश्य, मधुमेह आणि मानसिक विकार या चार प्रकारात औषधी संयुगांना जास्त मागणी असते.

इतके दिवस या औषधांवर बंदी का नव्हती?
– आपल्याकडे एफडीसीच्या मुद्दय़ावर अनेकदा चर्चाही झाली आहे. जगभरात याबाबत चर्चा होतात व ठरावीक निर्णय घेतले जातात, परंतु आपल्याकडे औषधांना मान्यता देणाऱया केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाबाबत २००२ पर्यंत संदिग्धता होती. या औषधांमुळे रुग्णाच्या जिवाला धोका असल्याचे स्पष्ट झाले होते. एफडीसीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या अभ्यासाअंती आता या औषधांवर बंदी आणण्यात आली आहे.

याचा औषध कंपन्यांना कोणता तोटा होऊ शकतो?
– अर्थातच औषध कंपन्यांना याचा फार मोठा फटका बसू शकतो. जकळपास ८० टक्के औषधे ३४४ औषधी संयुगांमध्ये मोडतात. हिंदुस्थानात या औषधांची मोठी बाजारपेठ आहे. या बंदीमुळे कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय जी औषधी केमिस्टपर्यंत पोहोचली आहेत ती आणणे व नष्ट करणे यांचीही पूर्तता त्यांना करावी लागेल.

डॉक्टर व ग्राहकांकर कोणता परिणाम होऊ शकतो?
– या ३४४ औषधी संयुगांवर पुन्हा बंदी घालण्यात आली तर याला पर्यायी नवीन औषधी बाजारपेठेत येईपर्यंत औषधांचा तुटवडा भासू शकतो. याशिवाय डॉक्टरांना औषधी लिहिताना अडचणी येतील. कारण वर्षानुवर्षे एका औषधी डोसमध्ये दोन किंवा अधिक औषधी संयुगे लिहिण्याची सवय असते. त्यामुळे डॉक्टरांना तो अभ्यास करावा लागेल. तसेच औषधी संयुगांऐवजी प्रत्येकी वेगळे औषध द्यावे लागेल.

या निर्णयाबाबत औषध कंपन्यांची भूमिका कोणती आहे?
– केंद्रीय आरोग्य विभागाकडून डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेन्सेडिल यासारख्या ३४४ औषधांवर बंदी घालण्याची शक्यता आहे. वेदनाशामक आणि फ्लूशी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीआय) औषधे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या औषधांवर बंदी घातली जावी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उपसमितीने शिफारस केली होती. ही शिफारस मान्य करून या औषधांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. सरकारने हा निर्णय घेतला तर पिरामल, सिप्ला, ल्युपीन यांसारख्या औषध बनवणाऱया कंपन्यांना त्याचा फटका बसणार आहे. कदाचित या कंपन्या सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयातही दाद मागू शकतात. ‘ड्रग टेक्नॉलॉजी अॅडव्हायजरी बोर्ड’ अर्थात डीटीएबीने दिलेल्या शिफारसींनुसार कोणकोणत्या औषधांवर बंदी घालायची त्याची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार ३४४ औषधांची नावे डीटीएबीने दिली आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने कंपन्यांकडे स्पष्टीकरण मागितले असता औषधे एकत्र केल्यामुळे कसा व नेमका किती फायदा रुग्णांना होऊ शकतो याचे स्पष्टीकरण कंपन्यांना देता आलेले नाही.

परदेशात याबाबतची यंत्रणा नेमकी कशी आहे?
– परदेशात विशेषत: पाश्चात्य देशात वेगवेगळी संयुगे एकत्र करून एक औषध तयार करत नाहीत. तिथे एका संयुगाचे एक वेगळे औषध दिले जाते. परदेशात फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनची औषधे देण्यास तिथल्या आरोग्य विभागाकडून मनाई आहे. काही देशांमध्ये अत्यल्प प्रमाणात औषधे दिली जातात. तिथे रुग्णांना औषधे देताना डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये फार्मासिस्ट हा महत्त्वाचा दुवा आणि घटक असतो. डॉक्टरांप्रमाणे फार्मासिस्टचा सल्ला आणि समुपदेशन महत्त्वपूर्ण मानले जाते. आपल्याकडे मात्र याबाबत संपूर्ण दुर्लक्ष आहे.

एफडीसी म्हणजे काय?
– कोणत्याही आजारावर उपचार म्हणून वापरण्यात येणारी औषधे जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रकार एकत्र करून तयार केली जातात अशा औषधांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन म्हटले जाते. ही औषधे घेण्याची विशिष्ट मात्रा ठरलेली असते. यात पॅरासिटामोल, फ्रेनिलेप्राइन, कॅफेन, क्लॉरेफेनिरामाइन मॅलिएट, कोडाइन सिरप अशा प्रकारांमध्ये तयार करण्यात येणाऱया औषधांचा समावेश आहे. तसेच पॅरासिटामोल, प्रॉपिफेनाजोन, कॅफेन हे तीन घटक वापरल्या जाणाऱया कॉम्बिनेशन ड्रग्जचाही यात समावेश आहे.