लातूरचे मुख्य शासकीय ध्वजारोहण बाभळगावात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

स्वातंत्र्य दिनानिमीत्त लातूर जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण हे शहरापासून सुमारे १० किलोमीटर दूर अंतरावरील बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील क्रीडांगणावर होणार आहे. हा निर्णय म्हणजे महंमद तुघलकी कारभाराचा उत्तम नमुना असल्याचे  म्हटले जात आहे.

लातूर शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडांगणावर दरवर्षी मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या समारंभाचे आयोजन केले जात असते. मात्र यंदा स्वातंत्र्य दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनाचे लातूर जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण आता लातूर शहरात होणार नाही तर शहरापासून सुमारे १० किलोमिटर अंतरावरील बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील क्रीडांगणावर होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याहस्ते  ध्वजारोहण होणार आहे.

लातूर शहरापासून सुमारे १० किलोमिटर दूर अंतरावर असणाऱ्या कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी शिवाजी चौकातून गांधी चौक, गोलाई मार्गे बाभळगाव येथील पोलीस क्रीडांगणापर्यंत खास बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहर बसेसची ही व्यवस्था माफक दरात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगीतले जात आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहण दूर अंतरावर ठेवण्यात आल्यामुळे मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.