दुसर्‍या कसोटीत इंग्लंडचे वर्चस्व, २५० धावांची आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

जॉनी बेअरस्टॉ आणि ख्रिस वोक्स यांनी केलेल्या १८९ धावांच्या धडाकेबाज भागीदारीच्या जोरावर यजमान इंग्लंडने येथे सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटीचा तिसरा दिवस गाजवला. पहिल्या डावात अवघ्या १०७ धावांमध्ये गारद झाल्यानंतर हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाला जॉनी बेअरस्टॉ व ख्रिस वोक्स या जोडीने शनिवारी अक्षरशः रडवले. ख्रिस वोक्स याने कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावताना नाबाद १२० धावांची संस्मरणीय खेळी केली. जॉनी बेअरस्टॉने ९३ धावांची फटकेबाजी करीत टीम इंडियाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ६ बाद ३५७ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे २५० धावांची आघाडी होती.

दरम्यान, दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव १०७ धावांमध्येच गडगडला. त्यानंतर ऍलिस्टर कूक व कीटन जेनिंग्स या इंग्लंडच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. दोघांनी २८ धावांची भागीदारी केली. मोहम्मद शमीच्या अफलातून चेंडूवर कीटन जेनिंग्स ११ धावांवर पायचीत बाद झाला आणि यजमानांना पहिला धक्का बसला. चार धावांची भर घालताच इशांत शर्माने ऍलिस्टर कूकला २१ धावांवर यष्टीरक्षक दिनेश कार्तिकरवी झेलबाद केले.

कर्णधार जो रूट व पहिला कसोटी सामना खेळणारा ओलिव्हर पोप ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच हार्दिक पांड्याने ओलिव्हर पोपला २८ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मोहम्मद शमीने जो रूटला १९ धावांवर पायचीत पकडून इंग्लंडला ८९ धावांवरच चौथा धक्का दिला. पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरलेल्या जोस बटलरलाही खेळपट्टीवर उभे राहून मोठी खेळी करता आली नाही. मोहम्मद शमीने त्याला २४ धावांवर पायचीत पकडले.  

दमदार भागीदारी

पाच बाद १३१ या धावसंख्येवरून जॉनी बेअरस्टॉ व ख्रिस वोक्स या जोडीने इंग्लंडचा डाव सावरण्यासाठी प्रयत्न केले. दोघांनी १८९ धावांची शानदार भागीदारी रचली. जॉनी बेअरस्टॉने १२ चौकारांसह ९३ धावांची, तर ख्रिस वोक्सने १८ चौकारांसह नाबाद १२० धावांची खेळी करीत हिंदुस्थानी गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावले. हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टॉला बाद केले. आता ख्रिस वोक्ससह सॅम करण (२२ धावा) खेळत आहे.