
सामना ऑनलाईन । मुंबई
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा दमदार पुनरागमन करून सक्रीय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात ठिकठिकाणी दमदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मागील २४ तासात ठाणे ३० मि.मी., मुंबई १० मि.मी., महाबळेश्वर ६० मि.मी., ताम्हिणी १०० मि.मी., कोयना ५० मि.मी., लोणावळा २० मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाने श्रावणसरी बरसवल्या आहेत. त्यामुळे पिकांच्या काळजीत हवालदिल झालेल्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे.























































