
सामना ऑनलाईन । मुंबई
ठाण्यात गेल्या रविवारी प्राची झाडे या तरुणीची एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली होती. या तरुणीवर हल्ला होत असताना रस्त्यावरील लोकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. अशा बघ्याची भूमिका घेणाऱ्यांवर माजी पोलीस महानिरीक्षक सुनील पारसकर यांनी टीका करत, बघ्याची भूमिका घेऊ नका, लोकांचा जीव वाचवा असे आवाहन केले आहे.

दै. सामनाचे सह संपादक प्रभाकर पवार यांनी ‘पोलीस डायरी’ या सदरात प्राची झाडे हिच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी लेख लिहिला होता. त्या लेखावर प्रतिक्रिया देताना सुनील पारसकर यांनी असे हल्ले होत असताना बघ्याची भूमिका न घेता मदतीसाठी पुढे सरसावा, हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पकडून द्या, असे आवाहान केले आहे. तसेच हल्ला झालेल्या व्यक्तीला मदत करताना जर तुम्हाला काहीही त्रास झाला तर मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करेन, असे आश्वासन देखील पारसकर यांनी दिले आहे.
एकतर्फी प्रेमातून ठाण्यात भररस्त्यात तरुणीची हत्या
”असहाय्य मुलीला वाचवायला कोणी हिंमत का करत नाही? सगळेच आपापल्या जीवाला घाबरतात काय? काय अशा जगण्याला अर्थ?? मित्रांनो,(मित्रों नव्हे) माझ्या मित्रांनो असा प्रसंग प्रत्येकासमोर होणार नाही. पण जेव्हा अशी वेळ येईल त्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा निर्दयी माणसाला जागेवरच पकडा, तोडा!! कायदा तुमच्या बाजूने येईल. त्यासाठी लागणारी सर्व मदत मी विनामूल्य करीन. पण असहाय्यतेने किंचाळणाऱ्या त्या बिचाऱ्या मुलींना बळी जाऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
























































