पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत मोहा गावाला प्रथम क्रमांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परळी वैजनाथ

पाणी फाउंडेशनने आयोजित केलेल्या वॉटरकप स्पर्धेत मोहा हे गाव हे तालुक्यातून प्रथम आले असून, अनुक्रमे इंदिरा नगर, भिलेगाव दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. रविवारी १२ ऑगस्ट रोजी पुणे येथे एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील,अमीर खान आणि किरण राव व मान्यवरांच्या उपस्थितीत या तीनही गावांना सन्मानित करण्यात आले. केवळ बक्षीसासाठी नाही तर आपले गाव पाणीदार व्हावे हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन नागरिकांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानाचे चीज झाले असून या तीनही गावांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला आहे. पाणी फाउंडेशनने आयोजित केलेली वॉटरकप स्पर्धा ही तालुक्यात लोकचळवळ म्हणून राबवल्या गेली. विविध गावातील नागरिकांनी झपाटून जाऊन या स्पर्धेत सहभाग तर नोंदवलाच. पण परळी शहर व तालुका पत्रकार संघ, युवा मदत फाउंडेशन, जाणिव महिला ग्रुप, परळी वकील संघ, परळी मेडिकल असोसिएशन, ग्रामसेवक संघटना, महसुल संघटना, आदींनी विविध गावात जाऊन श्रमदान करून ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणीत केला.