
सामना ऑनलाईन । पालघर
दमण बनावटीच्या दारू आणि बिअरचे लेबल बदलून महाराष्ट्रात विकणाऱ्या टोळीचा पालघरमध्ये पर्दाफाश झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या टोळी तील २ जणांना अटक केलं असून एका टेम्पोसह जवळपास १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे दमण बनावटीच्या दारूला महाराष्ट्राचे लेबल लावण्याचा कारखानाच विरारमध्ये असल्याचे उघडकीस आलंय.
दमण येथे बनवलेली दारू आणि बिअर महाराष्ट्रात विकली जात असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या साठी आरोपिंची मोडस ऑपरेंडीही कमालीची होती. भाजीपाल्याच्या टेम्पोमधून या दारुची ने – आण केली जात होती. पालघर जिल्ह्यातील मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील चारोटी चेक पोस्ट येथे सापळा लावला होता. रविवारी एका टेम्पोची चारोटी नाक्यावर तपासणी केली असता, त्यामध्ये दर्शनी भाजीपाला आणि त्याच्या खाली दमण बनावटीच्या दारु आणि बिअर चे १०५ बॉक्स आढळून आले. ही दारु विरार जवळ आणून, तेथील कारखान्यात महाराष्ट्र बनावटीचे लेबल लावून या दारूची महाराष्ट्रात विक्री केली जात असल्याची कबुली आरोपींनी दिली. या कारखान्यातील लेबल लावण्याची मशीन देखील जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे दमण बनावटीची स्वस्त दारू आणि बिअर आणून महाराष्ट्र बनावटीचे लेबल लावून सामान्य दरापेक्षा कमी दराने विक्रीच्या गोरख धंद्याचा पर्दाफाश राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला आहे.
दरम्यान, लेबल बदलून सदर दारू आणि बिअर कुणाला विकली जात होती. तसेच या टोळीची पाळे- मुळे शोधण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.

























































