
तालुक्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील उभे पिके करपू लागली असून यामुळे खरीपाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून याबाबत शासकीय यंत्रणेने परिस्थितीची पाहणी करावी अशी मागणी करण्यात आली होती. यानुसार सायगावात उपसभापतींनी पीक पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
चालू वर्षी अत्यल्प पर्जन्यमान असून तालुक्याच्या काही भागांत अजूनही पाऊस झालेला नाही. तिथे ढेकुळही फुटलेला नाही. ज्या भागात थोडाफार झाला होता तिथे शेतकऱयांनी पेरणी केली आहे, परंतु पिके उगवल्यापासून पाऊस नाही. सर्व पिके उन्हाने होरपळली आहेत. 4 ते 5 दिवसांत पाऊस न आल्यास सर्व पिके जळून खाक होणार आहेत. जनावरांचा चारा संपलेला असल्याने चाराटंचाई निर्माण झाली आहे.
उपसभापती रूपचंद भागवत यांनी सायगाव येथे करपलेल्या पिकांची पाहणी केली. प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवून तालुक्यात ठिकठिकाणी चारा छावण्या मंजूर कराव्यात तसेच पाऊस नसल्याकारणाने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरी, बोर यांनी तळ गाठला असून कोरडय़ा ठाक झाल्या आहेत. त्यामुळे पालखेड डावा कालवाद्वारे पाणी सोडून कालवा लाभ क्षेत्रातील सर्व बंधारे, नाले पाटपाण्याने भरून मिळावे अन्यथा तालुक्यातील गुरे, जनावरे चारा व पाण्यावाचून प्राण सोडतील असे भागवत यांनी म्हटले आहे. या वेळी सायगावचे माजी सरपंच गणपत खैरनार यांनी निवेदन दिले व लवकरात लवकर पीक पंचनामा करावा आणि सर्व शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी मदत करावी अशी मागणी केली. या वेळी गणपतराव खैरनार, सोसायटी चेअरमन गणपत उशीर, माजी सरपंच गोरख उशीर, शिवसेना शाखाप्रमुख दत्तू उशीर, सीताराम देवढे, कारभारी वालतूरे, देविदास जानराव, ज्ञानेश्वर भागवत, एकनाथ भालेराव, महेश भोईटे, नामदेव भोईटे, गोरख केकाणे, सुभाष बत्तासे, सुभाष वाकचौरे आदी उपस्थित होते.





























































