
सामना प्रतिनिधी । नगर
शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना दोघांनी सुमारे सव्वासहा लाख रुपयांना गंडिवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस निरीक्षकांची वर्दी चोरीला गेल्याची तक्रार झाल्यामुळे पोलिस खात्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, ओमासे हे शेवगाव शहरात एका भाड्याच्या खोलीत राहतात. रविवारी सकाळी सात वाजता त्यांची सरकारी वर्दी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर ओमासे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे. फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच ओमासे यांची खाकी वर्दी चोरीला गेल्याने हा विषय जिल्हा पोलिस दलात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
गोविंद ओमासे हे शेवगांव पोलिस ठाण्याचे प्रभारी आहेत. ते विद्यानगर भागामध्ये राहत असून घराला कुलुप लावून ते कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन कपाटात धांडोळा घेऊन कपाटातील खाकी वर्दी, बुट, टोपी असा ऐवज लंपास केला. काम आटोपुन ओमासे घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला व चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ओमासे यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.






























































