आंबा, काजू, बेदाणे प्रक्रिया उद्योगांना आर्थिक पाठबळ, राज्य सरकारची सहकार विकास महामंडळाला नवसंजीवनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अपुर्‍या भांडवलाचा सामना करणार्‍या आंबा, काजू, बेदाणा या फळप्रक्रिया उद्योगांबरोबरच अन्नधान्य प्रक्रिया उद्योगांना आता सहकार चळवळीचे पाठबळ मिळणार आहे. सहकारी फळ आणि अन्नधान्य प्रक्रिया उद्योग चालवण्यासाठी संबंधित सहकारी संस्थांकडे पुरेसे भांडवल नसल्याने त्यांचा व्यवसाय बंद आहे. त्याची सरकारने गंभीर दखल घेतली असून प्रक्रिया उद्योगांना सहकार चळवळीच्या माध्यमातून पुरेसे भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) पुनरुज्जीवित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ राज्यातील सहकारी उद्योगांना गरजेनुसार भांडवलाचा पुरवठा करत होते, मात्र गेल्या 18 वर्षांपासून या महामंडळाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे काजू, बेदाणा, आंबा, हळदी, तादूळ, ज्वारीवर प्रक्रिया करणार्‍या उद्योगांना पुरेसे भांडवल किंवा कर्ज उपलब्ध न झाल्याने अनेक प्रक्रिया उद्योग बंद आहेत, तर चालू उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब  करता आलेला नाही. त्यामुळे त्यांना पुरेसे भांडवल उपलब्ध करून देण्याबरोबरच मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘एमसीडीसी’ काम करणार आहे. त्यासाठी आधी ‘एमसीडीसी’ला सक्षम बनवण्याचा निर्णय सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून भांडवल उभारणी

आर्थिकदृष्ट्या आजारी असलेल्या सहकारी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुरेशा भांडवलाची गरज आहे. राज्यात 15 हजारांहून अधिक सहकारी पतसंस्था असून त्यांच्याकडे तब्बल 70 हजार कोटी रुपयांच्या ठेवी पडून आहेत. त्यामुळे त्यांना ‘एमसीडीसी’चे शेअर्स घेण्यासाठी प्रोत्साहित करून भांडवलाची उभारणी केली जाणार असून हा निधी पुढे प्रक्रिया उद्योगांना उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

हक्काची बाजारपेठ उभारणार

सहकारी प्रक्रिया उद्योगांनी तयार केलेल्या मालाला ‘एमसीडीसी’च्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार हौसिंग सोसायटय़ांमध्ये स्वतंत्र स्टॉल उभारण्यासाठी देणे व निर्यातीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.