
सामना प्रतिनिधी । मुंबई
जोगेश्वरीतील ५०० कोटींचा भूखंड ताब्यात घेण्यासंदर्भात जी दिरंगाई प्रशासनाने केली त्यासंदर्भात विकास नियोजन विभाग आणि विधी विभागातील २० अधिकाऱयांची चौकशी करण्यात आली असून चौकशी अहवाल पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये विधी विभागाच्या प्रमुखासह सहा अधिकारी निलंबित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून काही अधिकाऱयांची नोकरी जाण्याचीही शक्यता आहे. हा अहवाल लवकरच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
जोगेश्वरी मजासवाडी येथील मनोरंजन मैदान आणि रुग्णालयासाठी आरक्षित असलेला ३.३ एकरचा भूखंड ताब्यात घेण्यावरून पालिकेच्या विधी आणि विकास नियोजन विभागातील अधिकाऱयांनी जी अक्षम्य दिरंगाई केली त्यामुळे हा भूखंड बिल्डरच्या घशात गेला. प्रशासनातील या भ्रष्ट अधिकाऱयांविरुद्ध नगरसेवकांनी सुधार समिती आणि स्थायी समितीमध्ये आवाज उठवल्यानंतर आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीमध्ये येऊन याप्रकरणी भूमिका स्पष्ट केली होती. हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगून उपायुक्त निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार विधी विभागातील ६ व विकास नियोजन विभागातील १४ अधिकाऱयांची चौकशी करण्यात आली. ही चौकशी पूर्ण झाली असून दोन्ही विभागांचे दोन वेगवेगळे अहवाल आज निधी चौधरी यांनी आयुक्तांना सादर केले आहेत. याप्रकरणी दोषी असणाऱयांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी तेव्हा स्पष्ट केले होते. त्यामुळे आता नक्की कोणावर काय कारवाई होणार याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे. रस्ते आणि नालेसफाई यामधील दोषी अधिकाऱयांवर जशी कारवाई करण्यात आली तशीच कारवाई या प्रकरणातील दोषींवर केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
आयुक्तांनी लिहिलेला शेरा बदलण्यात आला
भूखंड ताब्यात घेण्याबाबत अक्षम्य दिरंगाई झालेली असतानाच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबत आयुक्तांनी लिहिलेला शेरादेखील बदलण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. तसेच या प्रकरणात पालिकेच्या पॅनलवरील वकील अभिषेक संघवी हे कोर्टात सुनावणीवेळी हजर राहत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच विधी विभागाची पुनर्रचना करण्याबाबतदेखील या अहवालात शिफारशी करण्यात आल्या आहेत.



























































