मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (बीपीटी) जमिनीवरील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती आणि खासगी वसाहतींच्या पुनर्विकासाचे धोरण ठरवण्यासाठी मुंबई जिल्हा नियोजन समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच निवेदन देणार आहे. त्यामुळे बीपीटीच्या जमिनीवर पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्याचे उद्योगमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हा वार्षिक योजना 2018-19 च्या मंजूर निधीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देसाई यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेने जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत अंगिकारलेल्या धोरणानुसार बीपीटीच्या जमिनीवरील 60-70 वर्षे जुन्या असलेल्या इमारतींचा पुर्निवकास करता येणे शक्य आहे, परंतु त्याकरिता केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक असल्याने पंतप्रधानांना जिल्हा नियोजन समितीकडून निवेदन दिले जाईल असे देसाई यांनी सांगितले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय…

गेट वे ऑफ इंडियासमोर उंच तिरंगा उभारणार

धारावी येथे उड्डाणपुलासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

दक्षिण मुंबईच्या समुद्रकिनाऱयावरील कांदळवनांमधील अतिक्रमणे हटवणार

बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार. तत्पूर्वी त्यातील धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी देण्याचे निर्देश

मुंबईतील सर्व जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत धोरण ठरवण्यास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक