दहशतवाद्यांना हुसकावून लावले, पाकड्यांची नापाक खेळी  हिंदुस्थानी जवानांनी उधळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

देशात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष सुरू असताना घातपात घडवून आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हिंदुस्थानी जवानांनी हाणून पाडला आहे. आज पहाटे पाकिस्तानकडून हिंदुस्थानात काही दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच सावध झालेल्या हिंदुस्थानी जवानांनी या घुसखोरांवर गोळीबार करत त्यांना सळो की पळो करून सोडले आणि पाकिस्तानचा हा डाव उधळून लावला. यावेळी अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत एक हिंदुस्थानी जवान जखमी झाला आहे.

नौशेरा सेक्टरमध्ये आज पहाटे सवापाचच्या सुमारास पाकिस्तानने काही दहशतवाद्यांना हिंदुस्थानी घुसवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानात घुसखोरांना घुसवून घातपात घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न होता. मात्र नियंत्रण रेषेवर काही तरी संदिग्ध हालचाली होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गस्तीवर असलेल्या जवानांनी या परिसराची बारकाईने पाहणी केली. यावेळी दहशतवाद्यांचा एक गट हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्याने हिंदुस्थानी जवानांनी या दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू केला. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनीही हिंदुस्थानी सैनिकांवर गोळीबार केला. त्यात एक हिंदुस्थानी जवान जखमी झाला. नियंत्रण रेषेवर बराच काळ ही चकमक सुरू होती. त्यामुळे बिथरलेल्या दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवरून पळ काढला. या चकमकीनंतर जवानांनी नियंत्रण रेषेजवळील संपूर्ण परिसरात ऍलर्ट जारी केला आहे. दरम्यान, या चकमकीत जखमी झालेल्या जवानाला उधमपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.