
सामना प्रतिनिधी । महाड
कोटय़वधी रुपये खर्चून महाड येथे उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची अल्पावधीत दुरवस्था झाली आहे. संतापजनक म्हणजे दुरुस्तीसाठी निधी पडून असताना सार्वजनिक बांधकाम खाते त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्मारकाच्या प्रांगणातील भव्य पुतळय़ाचा चौथराच ढासळला आहे. याबाबत व्यवस्थापनाने वारंवार लेखी निवेदन देऊनही सरकार दुर्लक्ष करीत असल्याने महाडकरांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात महाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या प्रशस्त जागेत 15 कोटी रुपये खर्च करून हे भव्य स्मारक उभारण्यात आले होते. मात्र आघाडी व आताच्या भाजप सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने दुर्लक्ष केल्याने स्मारकाची दुरवस्था झाली आहे. स्मारकाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी पुण्यातील बार्टी या राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थेकडे देण्यात आले. स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम स्थानिक महाड सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कsले जाते. परंतु अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे स्मारकाला विविध समस्यांनी ग्रासले आहे.
महाडकर नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तरण तलावाची निगा राखली जात नसल्याने तलावात शेवाळांचा थर साचला आहे. स्मारक प्रशासनाने याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा कsला. तरीही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपूर्वी स्मारकाच्या आवारातील बाबासाहेबांच्या पूर्णापृती पुतळ्याचा चौथरा ढासळला आहे. याबाबत लेखी सूचना करूनही कानाडोळा केला जात असल्याने पुतळ्याला धोका निर्माण झाला आहे.
लोकांच्या भावनांचा अंत पाहू नका!
राष्ट्रीय स्मारकाच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा असतानाही स्मारकाकडे दुर्लक्ष कsले जाते, याबाबत आंबेडकरी जनतेने जाब विचारला आहे. लोकांच्या भावनांचा अंत पाहू नका, नाहीतर याची झळ सार्वजनिक बांधकाम विभागाला सोसावी लागेल, असा इशारा दलितमित्र मधुकर गायकवाड यांनी दिला आहे.































































