मुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला छुपा पाठिंबा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

सनातन संस्थेविरुद्ध पुरावे सापडले असून मुख्यमंत्र्यांनी अजूनही प्रतिक्रिया दिली नाही, याचा अर्थ या संघटनांना राजाश्रय असून सरकारचा त्यांना अप्रत्यक्ष पाठींबा अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

वैभव राऊतच्या घरात बॉम्ब सापडले, सनातन संस्था किंवा हिंदू जागृतीमंच या संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, राज्यात जातीय दंगल घडून आणण्यासाठी परिषद होते, असं असताना देखील मुख्यमंत्री काहीच बोलत नाही. हे सर्वात आश्‍चर्यकारक आहे, याचा अर्थ या संघटनांना राजाश्रय आहे सरकारचा त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा आहे, असे विखे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आम्ही सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करतो, मात्र सरकार काही बोलत नसल्याने यांच्यामधील संबध काय? तसेच संभाजी भिडे देखील बेताल वक्तव्य करतात त्यावरही सरकार बोलत नाहीत. मात्र मुख्यमंत्री विधानसभेत समर्थन करतात, आता तर एटीएसने पुरावे दिले आहेत, तसेच कारवाई केली आहे. मात्र अद्यापही सरकार काही बोलत नाही असे ते म्हणाले. तसेच कर्नाटकात पोलिसांकडून गौरी लंकेशच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक झाली. मात्र अजूनही दाभोळकर आणि पानसरेंचे मारेकरी मोकाट आहेत, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

मला आश्‍चर्य वाटते मुख्यमंत्र्यांना आषाढी यात्रेमध्ये साप सोडणार हे समजतं, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि बॉम्ब सापडतो ही माहिती मिळत नाही. हे मुख्यमंत्र्यांचं अपयश असल्याचं ते म्हणाले. तसेच राजीनामा मागितला तर ते देणार नाही. सनातनच्या मोर्चांना सरकार रसद पुरवते असा गंभीर आरोप देखील विखे यांनी करुन खळबळ उडवली आहे. मुख्यमंत्री काही बोलत नाही याचा अर्थ त्यांचे या सर्व बाबींना समर्थन आहे का? असे विखे म्हणाले. माझ्या विरोधात दहा कोटींचा दावा दाखल केला. मला त्याची चिंता नाही, मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर याची चिंता जास्त आहे. खुलेआम अश्या प्रकार जातीय शक्ती पुढे येताय. तर भीमा कोरेगाव प्रकरणात एक न्याय मात्र सनातन संस्थेचे पुरावे आहे. तरी कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. हे सरकारचे खुले समर्थन असल्याचा आरोप विखे यांनी केला आहे.