
सामना ऑनलाईन । मुंबई
वाजपेयी हे पंतप्रधान असताना हिंदुस्थानी क्रिकेट संघाची त्यांच्याशी भेट झाली होती. 2004 मध्ये हिंदुस्थानी संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याआधी वाजपेयींना भेटला होता. त्यावेळी हिंदुस्थान 1985 नंतर 19 वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर जात होता. तसेच हिंदुस्थान-पाकिस्तान सामने पाहण्यासाठी जाणाऱ्या जवळजवळ 20,000 हिंदुस्थानी चाहत्यांचा व्हिसा मंजूर करण्यात आला होता. हिंदुस्थानच्या संघाची आणि वाजपेयींच्या भेटीबद्दल त्यावेळचे हिंदुस्थानी संघाचे व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी आठवण सांगितली आहे.
शेट्टी यांनी सांगितले की, हिंदुस्थानी संघ पाकिस्तानला रवाना होण्याच्या एक तास आधी वाजपेयींना भेटला होता. त्यावेळी त्यांनी हिंदुस्थानी संघाला सांगितले की, या दौऱ्यात तुमचा मोटो ‘खेल भी जितिये, दिल भी जितिये’ (खेळही जिंका आणि मनेही जिंका) असा असायला हवा. याबरोबरच वाजपेयी यांनी त्यावेळचा हिंदुस्थानचा कर्णधार सौरव गांगुलीला एक बॅटही भेट दिली होती. त्यावर ‘खेल ही नहीं दिल भी जितिये, शुभेच्छा’ असा संदेश लिहिलेला होता.
त्यावेळी हिंदुस्थानी संघाचा सौरव गांगुली कर्णधार होता, तर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, मोहम्मद कैफ असे हिंदुस्थानी संघात खेळाडू होते. या दौऱयात हिंदुस्थानी संघाने कसोटी मालिका 2-1 आणि वन डे मालिका 3-2 ने जिंकली होती.




























































