
सामना प्रतिनिधी । शिरुर
पुणे जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यात बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली आहे. शिरुर येथील कवठे येमाई परिसरात शुक्रवारी पहाटे बिबट्याने हल्ला करून एक बैल, दोन मेंढ्या आणि एक शिंगरु ठार केलं. त्यामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत जगत आहेत.
बिबट्याच्या दहशतीमुळे सध्या शिरुर तालुक्यातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. शुक्रवारी येथील दाभाडे वस्तीवरील नाना दाभाडे यांच्या घराबाहेर बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ल्या करून ठार केलं. तर टावरे वस्तीनजीकच्या शेतात असलेल्या मेंढ्याच्या तळावरून मेंढपाळ बंडू करगळ यांच्या दोन मेंढ्या पळविल्या असून एका घोडीच्या शिंगरालाही बिबट्याने ठार केलं. तसेच काही अंतरावरील मेंढ्याच्या तळावरही पहाटे ३ च्या सुमारास बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण बाजूलाच असलेल्या बाबाजी भाईक या तरुणाने प्रसंगावधान राखत बिबट्याला हुसकावून लावले. गावातील मुखेकरवस्ती, टाव्हरेवस्ती, इनामवस्ती, पोकळदरा परिसरात देखील बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे बिबट्याच्या दहशतीने शेतकरी दिवसाही शेतात जायला घाबरत आहेत.
दरम्यान, वन विभागाने पिंजरा लावला असला तरी बिबट्या हुलकावणी देत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वन विभागाने बिबटयांच्या बंदोबस्तासाठी युद्धपातळीवर उपाय योजना करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.


























































