
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रबोधन प्रकाशनातर्फे ‘बाळासाहेब’ मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा हुंकार या पुस्तकाचे प्रकाशन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. ‘बाळासाहेब’ या पुस्तकाचे लेखन-संपादन शिवसेना नेते सुभाष देसाई आणि ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
या पुस्तकात बाळासाहेबांचे मराठी प्रेम, महाराष्ट्र धर्म, हिंदुत्व, राष्ट्रप्रेम, ठाकरे कुटुंबावरील प्रेम, बाळासाहेबांचे गाजलेले अग्रलेख यांचा समावेश आहे. व्यंगचित्रकार बाळासाहेब, मार्मिक व शिवसेनेचा जन्म, त्यांच्या यशस्वी वाटचालीवर विस्तृतपणे लिखाण केले आहे. बाळासाहेबांची काही छायचित्रे आणि व्यंगचित्रे यांचाही समावेश केल्यामुळे ‘बाळासाहेब’ पुस्तकाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या तरुण पिढीला आणि मराठी वाचकांना बाळासाहेबांच्या संघर्षमय जीवनाची महती आणि माहिती देण्याचा स्तुत्य प्रयत्न शिवसेना नेते सुभाष देसाई आणि ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र ठाकूर यांनी केला आहे. या पुस्तक प्रकाशनावेळी रश्मी ठाकरे, शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव विनायक राऊत, आमदार बाळा नर, प्रबोधन प्रकाशनचे संचालक विवेक कदम आदी उपस्थित होते.

























































