
>> द्वारकानाथ संझगिरी
अजित वाडेकर नावाची एक रोमहर्षक कथा संपली. एकेकाळी प्रचंड आनंद देणारं हे कथानक जाता जाता रडवून गेलं.
योगायोग पाहा.
सुनील गावसकरचा कसोटी क्रिकेटचा पाळणा अजितने हलवला. पाळण्यातले सुनीलचे छोटे पाय बघता बघता आकाशाएवढे झाले. तोच सुनील अजित वाडेकरने शेवटचा श्वास घेताना अजितच्या जवळ असावा हा केवढा योगायोग! अजित श्वासासाठी धडपडायला लागला तेव्हा रेखा वहिनी धावत सुनीलकडे गेल्या. सुनीलच्या आईसाठी तिथे बऱयाचदा नर्स असते. त्या दिवशी ती नव्हती, पण सुनील होता. तो वर आला. ‘कम ऑन कॅप्टन, कम ऑन’ म्हणत सुनीलने आवाज देत अजितमध्ये जान भरण्याची शर्थ केली. सुनीलने निर्णय ‘थर्ड अंपायर’कडे नेण्याचा प्रयत्न केला, पण अजितला जीवदान मिळालं नाही.
मृत्यूची बातमी वाऱयासारखी पसरली आणि ज्याच्यासाठी अजित वाडेकरने ज्यांच्या वडिलांची भूमिका निभावली ते सचिन आणि विनोद अजितकडे एकत्र आले. मला ते जुने दिवस आठवले. 1993 ते 96चे. आणि नंतर थोडे पुढचेसुद्धा! सुरुवातीला सचिन-कांबळीसाठी अजित हा शिक्षक होता. त्यांनी अजितला शेवटपर्यंत ‘सर’ म्हटले, पण त्यांचे संबंध राहिले मुलांचे, खरं तर मित्राचे! केवढं वयातलं अंतर… पण कधी संपलं कुणाला कळलं नाही. एक किस्सा मला आठवतोय. सचिन बाद झाल्यावर अजितने प्रेमाने रागावून त्याला म्हटलं, ‘‘असा कसा आऊट झालास?’’ सचिन केवढा अदबशीर, पण एखाद्या मित्राला म्हणावा तसा सचिन अजितला म्हणाला, ‘‘सर, तुम्ही काय कधी आयुष्यात बादच नाहीत झालात का?’’
पुन्हा एक योगायोग.
सचिनमधल्या वन डेतल्या महान फलंदाजाचा पाळणाही अजितने हलवला. न्यूझीलंडमध्ये सिद्धू जायबंदी झाला. सचिनने हट्ट धरला मी आघाडीला जातो. अजितने तो पुरवला आणि सचिनच्या वन डे कारकीर्दीचा इतिहास देदीप्यमान झाला.
विनोदचे त्याने कान उपटले, पाठीशीही घातले. मला एक किस्सा आठवतोय श्रीलंकेचा. मी, अजित आणि माझी बायको आम्ही बाहेरून ताज समुद्रमध्ये आलो. त्या हॉटेलच्या फॉयरमध्ये विनोद रडत होता. मी अजितला म्हटलं, ‘‘विनोद रडतोय.’’ अजित म्हणाला, ‘‘सोड त्याला.’’ तरीही मी अजितला घेऊन त्याच्याकडे गेलो. मी म्हटलं, ‘‘काय झालं?’’ विनोद म्हणाला, ‘‘सर, मला मैत्रिणीला इथे आणायला देत नाहीत. (त्याच्या पहिल्या बायकोच्या वेळची गोष्ट.) मी अजितकडे पाहिलं. अजित म्हणाला, ‘‘त्याला कळत नाही का की माझं कोड ऑफ कण्डक्ट काय आहे? खेळाडूबरोबर बायका नको असं ठरवलंय.’’ मी पुन्हा विनोदकडे पाहिलं. विनोद म्हणाला, ‘‘सरांना विचार मग कपिलची बायको कशी आली?’’ मी पुन्हा अजितकडे पाहायच्या आत अजित म्हणाला, ‘‘कपिल 125 कसोटी सामने खेळला आहे. त्याला आधी 25 खेळूदेत.’’
अजित प्रशिक्षक म्हणून निवृत्त झाला आणि विनोदच्या कारकीर्दीची बोट डगमगायला लागली.
दोघे अजितकडे आले आणि त्याचं पार्थिव पाहून ढसढसा रडले. मीसुद्धा विनोदच्या खांद्यावर डोकं ठेवून रडलो तेव्हा शांत झालो. खरंच अश्रू ही भावनांचा दबाव कमी करणारी व्हॉल्व्ह आहे.
कधीही सचिन-विनोद भेटला की आम्ही निघताना ‘च।़।़’ असं म्हणतो. कारण आपण ‘चल’ म्हणतो तसा अजित फक्त ‘च।़।़’ असं म्हणायचा.
यापुढे ‘टू गुड’, ‘सुपर्ब रे’ असं माझ्या लेखाचं किंवा बोलण्याचं कौतुक कोण करणार? अजितची ती लाडकी विशेषणं.
…आणि एक योगायोग.
अजितपाठोपाठ अटलजी गेले.
एकाने क्रिकेटमध्ये टीम स्पिरीट हे काय करू शकतं हे दाखवलं. दुसऱयाने इतर पक्षांना एकत्र करून काँग्रेसला हरवून पाच वर्षं राज्य करता येतं हे दाखवलं.
एकाने प्रेमाने सर्वांना एकत्र केले आणि दुसऱयानंही सर्वांना एकत्र घेऊन राज्य केलं. लोकशाहीवरची दोघांची निष्ठा प्रबळ होती.
एक ‘अजित’ होता, दुसरा ‘अटल’!
एकनाथ सोलकर, रमाकांत देसाई, अशोक मंकड, पॉली उम्रीगर, हनुमंतसिंग वगैरे गेल्यानंतर एका वर्षापूर्वी अजित मला म्हणाला होता, ‘‘रात्री ऍम्ब्युलन्सचा आवाज ऐकला की भीती वाटते, कधी तरी आपणही त्याच्यातून जाणार अशी. माझ्या टीममधले कितीतरी गेले रे!’’
त्यांना कर्णधार हवा होता तो मिळाला.
आम्ही मात्र पोरके झालो.


























































