
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्याला सीबीआयने अटक आली आहे. सचिन अणधुरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याला संभाजीनगरमधील संभाजीपेठेतून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दाभोळकर हत्ये प्रकरणी वीरेन्द्र तावड़े नंतर सचिन अणधुरे या दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात सीबीआयला यश आले आहे.

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत संभाजीनगरमधून 14 तारखेला रात्री सचिन अणधुरेला अटक केली आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या महर्षी शिंदे पुलावर म्हणजेच ओंकारेश्वर पुलावर करण्यात आली होती. सकाळी सात वाजून 20 मिनिटांच्या सुमारास दोन तरूणांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून येऊन दाभोलकरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. त्यामुळे दाभेळकर हत्ये प्रकरणीच्या कटाचे आणखी धागे दोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई एटीएस आणि सीबीआयच्या टीमने १४ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता संभाजीपेठेतून सचिन अणधुरेला नालासोपारा बॉम्ब तयार करण्याच्या प्रकरणात ताब्यात घेतले होते. अणधुरेच्या चौकशीत पोलिसांना त्याने दाभोळकर यांची हत्त्या केल्याची कबुली दिली आहे. सचिन अणधुरे याला आई वडील नाहीत. एक मोठा भाऊ असून तो राजाबाजार भागात राहतो. त्याचा भाऊ विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत.
दरम्यान, नालासोपारा येथे सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींना आणखी दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी तिन्ही आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.





























































