
सामना प्रतिनिधी, वाणगाव
मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असतानाही खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट आज बुडाली. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून या बोटीवरील 11 मच्छिमार बचावले. भाग्यलक्ष्मी असे या बोटीचे नाव असून मच्छिमारांचे प्राण वाचल्याने त्यांचे नातेवाईक व धाकटी डहाणू येथील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
आज दुपारी दोनच्या सुमारास भाग्यलक्ष्मी बोट मच्छिमारीसाठी गेली होती. 30 नॉटीकल मैल खोल समुद्रात गेल्यानंतर लाटांच्या तडाख्याने फळी तुटून आत पाणी शिरू लागले. मालक भानुदास तांडेल यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आजूबाजूच्या बोटींना वायरलेस मॅसेज केला. तातडीने पवनसाई, महालक्ष्मी व तुळजाभवानी या तीन बोटींनी तातडीने धाव घेतली.
या बोटींवरील खलाशांनी मोठ्या प्रयत्नाने मालक तांडेलसह जयवंत तांडेल, नरेश दवणे, तुळशीदास तांडेल, संजय काटेला, राहुल ठाकरे, नीलेश वळवी, अजय वरळ, महेश मानकर, गणपत हाडळ, राध्या वळवी या मच्छीमारांना सुखरूप दुसऱ्या बोटीतून किनाऱ्यावर आणले.































































