
सामना प्रतिनिधी, मुंबई
अंधेरी ते दहिसरदरम्यान मोठ्या प्रमाणावर मेट्रो रेल्वेची कामे सुरू असली तरी गणेशोत्सवापूर्वी या सर्व ठिकाणी मेट्रोचे बॅरिकेडस् आत ढकलून मिरवणुकांसाठी जागा करून दिली जाणार आहे. गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱयांना मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तसे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अंधेरीपासून दहिसरपर्यंतचे मेट्रोचे अडथळे दूर होणार आहेत.
संपूर्ण मुंबईभर सुरू असलेल्या मेट्रोच्या खोदकामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते बॅरिकेडस् लावून अडवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा अनेक गणेश मंडळांसमोर गणपती आणायचे कोणत्या मार्गावरून असा प्रश्न उभा होता. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेच्या आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम उपनगरातील रस्त्यांची पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी आमदार विनोद घोसाळकर, समितीचे कोषाध्यक्ष अशोक पटेल, माजी नगरसेवक अनिल त्रिंबककर व त्या त्या विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवक राजू पेडणेकर, माजी नगरसेवक यशोधर फणसे, राजू पाध्ये यांच्यासह सुधाकर सुर्वे, मधुकर राऊत, संतोष राणे, हरिश्चंद्र राणे आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी आपल्या सूचना या पाहणीच्या वेळी मांडल्या.
लिंक रोड खुला करणार
डी. एन. नगर परिसरातील बॅरिकेडस् मागे हटवण्यात येणार आहेत तर बेहरामबाग येथील जंक्शनचे अडथळे दूर होणार आहेत. गोरेगाव अण्णाभाऊ चौकातील जंक्शनवरील बॅरिकेडस् आत सरकवणार असल्यामुळे हे रस्ते रुंद होणार आहेत. मालाड डी मार्ट येथे सपोर्टसाठी लावलेले लोखंडी पिलर काढून टाकण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे लिंक रोड मिरवणुकांसाठी खुला होणार आहे. चारकोप लालजी पाडा ते महावीर नगर येथील नव्याने सुरू होणारी कामे तात्पुरती थांबवण्यात येणार आहेत.
summery- metro work will get shrink for ganeshotsav























































