
देवेंद्र भगत, मुंबई
कोळी संस्कृती, स्वच्छ किनारा, जीम, पार्किंग, मुलांना खेळण्यासाठी जागा, मनमोहक लायटिंग आणि अत्याधुनिक सुविधा माहीम बीचवर लवकरच उपलब्ध होणार आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांशी प्रकल्पाचा दोन टप्प्यात विकास होणार आहे. 2.5 किमीच्या लांब किनाऱयाच्या विकासासाठी पालिका 1.39 कोटींचा खर्च करणार आहे.
पर्यटकांना सहज जाता येणारा माहीम समुद्रकिनारा सुविधा नसल्याने काहीसा दुर्लक्शित राहिला आहे. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्याच्या विकासाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. यामध्ये पहिल्या टप्प्यात पर्यटकांसाठी खास सुविधा देण्यात येणार आहेत. यानुसार संपूर्ण किनारा स्वच्छ करण्यात येईल.
झाडे, फुले आणि मोकळी जागा
माहीम समुद्र किनाऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची शोभेची झाडे आणि फुलझाडे लावण्यात येणार आहेत. हिंदुस्थानी संस्कृतीचे दर्शन घडवणारे सण-उत्सव साजरे करण्यासाठी प्रशस्थ मोकळी जागा ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पे-ऍण्ड पार्कची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. ज्यामुळे आगामी काळात पालिकेला उत्पन्नाचे साधनही निर्माण होणार आहे. पर्यटकांना बसण्यासाठी आरामदायी आसने बसवणार. शिवाय उंचावरून मुंबईचा नजारा पाहण्यासाठी टॉवरही बनवण्यात येईल.
कोळी संस्कृतीचे दर्शन घडणार
समुद्र किनाऱ्यावर कोळी संस्कृतीचे दर्शन घडवण्यात येणार आहे. यासाठी कोळी बांधवांसाठी त्यांच्या बोटी आणि जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी शेड उभारण्यात येईल. या शिवाय जुन्या बोटीही प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील. याशिवाय किल्ल्याची ऐतिहासिक प्रतिकृतीही तयार करण्यात येईल. जेणेकरून मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक गर्दी करतील.
मुंबईचे सर्व समुद्र किनारे आकर्षक बनवण्यासाठी सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. यामधील माहीम किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील विकासासाठी येत्या सहा महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. तर दुसऱ्या टप्प्यातील विकासासाठी ‘सीआरझेड’बाबतच्या परवानग्या मिळाल्यानंतर काम केले जाईल.
-डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)
summery- mahim beach to became high tech



























































