
सामना प्रतिनिधी । नागपूर
जुलै महिन्यात बरसलेल्या पावसाने तब्बल महिनाभरानंतर तीन दिवसांपूवी पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संकटात सापडलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. त्यातच कालपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले असून भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर परिसरातील राजेदहेगाव येथे घराचे छत पडल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी (दि.21) उघडकीस आली आहे.
राजेदहेगाव येथील पोलीस पाटील मधुकर ढोबळे यांच्याकडे शेतीच्या कामासाठी रोजंदारीवर काम करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील निलज खंडाळा येथील शेतमजूर निवासी मुक्कामी होते. दरम्यान कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे ते ज्या घरात वास्तव्यास होते. त्या घराचे छत रात्रीच्या सुमारास ते गाढ झोपेत असताना पडल्याने त्यात दबून सुकरू दामाजी खंडाते, पत्नी सारीका सुकरु खंडाते आणि 3 वर्षीय मुलगी नंदीनी सुकरु खंडातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांना माहिती देण्यात आली असून जिल्हाप्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे.
भंडारा जिल्ह्यात रात्रीपासून सतत पाऊस सुरु असून सर्वच तालुक्यात अतिवृष्ठी झालेली आहे. भंडारा, मोहाडी व लाखनी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्हाप्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
गोंदियातही दमदार पाऊस
गोंदिया : जिल्ह्यात आठवभरापासून दमदार पाऊस येत असून पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसाने जिल्ह्यातील नदी, नाले व धरण पाणीसाठा मुबलक प्रमाणात वाढला असून सरासरी ८५ टक्के पाऊस पडला आहे. रात्री रतनारा, तिरोडा, वडेगाव, महागाव, अर्जुनी मोरगाव, मुंडिकोटा, केशोरी, डव्वा, सडक अर्जुनी व सौंदड या महसुल मंडळाच्या ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम असून सकाळपासून जिल्ह्यातही रिमझिम पाऊस सुरु झाले आहे.





























































