बकरी ईदसाठी दोन लाख बकर्‍यांची कुर्बानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बकरी ईदसाठी आतापर्यंत देवनार पशुवधगृहातून तब्बल दोन लाख बकर्‍यांची विक्री झाली असून पुढील दोन दिवस ही विक्री देवनारच्या बाजारात सुरू राहणार आहे. त्यामुळे बकर्‍यांचा हा आकडा अडीच लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, वसई-विरारपर्यंत हे बकरे विक्रीस गेले आहेत. यंदा देवनारच्या बाजारात तब्बल 2 लाख 35 हजार बकरे विक्रीसाठी आले आहेत.

बकरी ईदसाठी देवनारच्या पशुवधगृहात दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या प्रमाणावर बकरे विक्रीसाठी आलेले आहेत. 10 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या बाजारात आतापर्यंत तब्बल 2 लाख 35 हजार बकरे विक्रीसाठी आले आहेत. यापैकी 1 लाख 97 हजार बकरे बुधवारी संध्याकाळपर्यंत विकले गेले. तर बकरी ईदनंतर बासी ईदचा सण पुढील दोन असल्यामुळे तोपर्यंत उर्वरित बकरे विकले जातील अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.  

100 जणांना  कुर्बानीसाठी परवानगी

कुर्बानीसाठी आतापर्यंत ज्यांना ऑनलाइन परवानगी दिली गेली त्यांची परवानगी रद्द करून आजपासून नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आज दिवसभरात 100 अर्ज आले असून त्यांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. अर्जदाराचा पत्ता आणि वास्तव्याचा दाखला अपलोड केल्यानंतर त्याची शहानिशा करूनच परवानगी दिली जात असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. ही परवानगी देण्याची प्रक्रिया पुढील दोन दिवस सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई हद्दीत कुर्बानीसाठी ही परवानगी दिली जात आहे.  

सर्वाधिक किंमत सवा लाखाची

विक्रीला आणलेल्या बकर्‍यांची वाट्टेल ती किंमत व्यापार्‍यांनी लावलेली असली तरी आतापर्यंत विक्रीस गेलेल्या बकर्‍यांपैकी एका बकर्‍यासाठी सर्वाधिक किंमत सवा लाखापर्यंत मोजण्यात आली असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. बाजारभावाप्रमाणे बकर्‍यांची किंमत 40 किलोला 40 हजार रुपये इतकी असते, मात्र त्या तुलनेत ही खूप मोठी किंमत या बकर्‍याला हौशी गिर्‍हाईकाने दिली आहे.