
सामना ऑनलाईन, पैठण
नाथसागरात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असून, सध्या २२ हजार क्युसेक्स प्रतिसेकंद या वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकूण २२ टक्क्यांची वाढ झाली असून, रात्री धरणात आतापर्यंत ४० टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली आहे.
२२ ऑगस्ट रोजी नोंद झालेल्या पाणीपातळीचा तपशील खालील प्रमाणे आहे. एकूण १५२२ फूट क्षमतेच्या या प्रकल्पात सध्या १५०७.६८ फूट वापरायोग्य साठा आहे. मीटरमध्ये हा पाणीसाठा ४५९.५४२ एवढा आहे. १५१९.७९८ दशलक्ष घनमीटर असलेल्या या पाण्यापैकी ७८१.६९२ दशलक्ष घनमीटर एवढे पाणी वापरायोग्य आहे. जायकवाडी धरणाच्या वरील भागांतील सर्व २० लहान-मोठी धरणे जवळपास पूर्ण भरली आहेत. या धरणातून सोडण्यात आलेले पाणी प्रचंड वेगाने कुठेही न थांबता थेट जायकवाडी धरणात दाखल होत आहे. त्यामुळे नाथसागरच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात २८ टक्के जलसाठा उपलब्ध असलेल्या या धरणात आज रोजी ४० टक्क्यांवर पोहचला आहे.
नाशिक परिसरात जोरदार पाऊस सुरू असून, जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. भरलेल्या धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडले जात असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. सध्या धरणात २२ हजार ५६० क्युसेक्स वेगाने पाणी दाखल होत आहे.
धरणाच्या वरील बाजूस असलेले कडवा, भावली, करंजवन, वालदेवी, गौतमी, कश्यपी, दारणा, मुकने, निळवंडे, भंडारदरा, नांदूर मधमेश्वर, गंगापूर, वाघाड ही १४ लहान-मोठी धरणे पुर्णक्षमतेने भरली आहेत. यापैकी नांदूर-मधमेश्वर धरणातून २० हजार २४४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. भंडारदरा धरणातून ५ हजार ५४३ क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जायकवाडी धरणात फक्त १९ टक्के जलसाठा शिल्लक होता. नाशिक जिल्ह्यात व धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत सरासरी २२ टक्के वाढ झाली आहे. सध्या पाण्याची आवक लक्षात घेता आणि अशीच परिस्थिती राहिल्यास सप्टेंबर अखेर परतीचा पाऊस पडण्या अगोदर जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरेल. असा अंदाज जायकवाडी धरण सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.




























































