श्रीरामपूरात चोरट्यांचा धुमाकूळ: एकाच रात्रीत चार दुकाने फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरात चोरांनी धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. त्यातून बँकेच्या रांगेत उभे असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातून पाऊन लाख लुटण्यापासून एकाच रात्री चार दुकाने फोडण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. नुकतेच आयएसओ मानांकन मिळालेल्या पोलीस ठाण्यातील पोलीस शहरात रात्रभर गस्त घालीत असल्याचा दावा करतात मग या चोऱ्या झाल्याच कशा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सुदर्शन भिमाशंकर उपरे हे येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये असतांना तीन महिलांनी त्यांचे तब्बल ९६ हजार रूपये पळविले. त्यांनी आरडाओरडा करण्यापूर्वी त्या तिघीही पसार झाल्या. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना ताजी असतानाच शिवाजी रस्त्यावरील तीन दुकाने फोडली. चोरट्यांनी सई पेहराव या महिलांसाठी असलेल्या दुकानातून पाच ते सहा लाख रुपयांचे कपडे चोरून नेले. आज गुरूवारी पहाटे साडे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात एक आरोपी कैद झाला आहे.

केशरप्रेम इमारतीत मंजुषा गलांडे यांचे सई पेहराव हे दुकान असून काल रात्री त्या दुकान बंद करून घरी गेल्या. पहाटे साडेचारच्या सुमारास चोरट्याने कटावनीने दुकानचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील किंमती कपडे भरून तो पसार झाला. चोरटा दुकानात असल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले आहे. आज दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार गलांडे यांच्या निदर्शनास आला.

याच दरम्यान जवळील चायना सेलचे दुकान फोडले. परंतु तेथील सायरन वाजल्याने चोरटे तेथून पळाले. त्यानंतर बी. ई. वाघ यांचे कार्यालय व मोहीत फुट वेअर हे चप्पलेचे दुकान फोडले. परंतु त्यांना चोरी करण्यात यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासासाठी नगरहून श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. त्यातील श्वान तेथेच घुटमळल्याने चोरटे तेथून वाहनातून गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ग्रामिण भागातही चोऱ्या
शहराजवळ असलेल्या गोंधवणी व दिघी शिवारातही चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. दिघीचे बाबूभाई शेख व जाधव यांच्या दोन म्हशी दोन दिवसांपूर्वी टेम्पोत घालून चोरी झाल्याची घटना घडली आहे.