डिग्रस बंधार्‍याच्या दोन दरवाज्यातून पाणी सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । परभणी

पालम तालुक्यातील डिग्रस येथील उपसा जलसिंचन योजनेतंर्गत उभारण्यात आलेला बंधारा सध्या ५१ टक्के भरला असून यामुळे गोदावरी नदीतील बॅक वॉटरचा साठा वाढलेला आहे. परिणामी बॅक वॉटर कमी करण्यासाठी डिग्रस बंधार्‍यातून २२ ऑगस्ट रोजी दुपारपासून दोन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. विसर्ग झालेले हे पाणी गोदापात्रातून थेट नांदेडकडे विष्णुपुरी प्रकल्पात जमा होत आहे.


या डिग्रस बंधार्‍याची पाणी साठविण्याची क्षमता ६३.८५ द.ल.घ.मी. असून गतवर्षी हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला होता. यंदा मात्र ५१ टक्क्यापर्यंतच भरलेला आहे. परिसरातील शेतकर्‍यांना या बंधार्‍याची ‘असून अडचण नसून खोळंबा’ या उक्तीप्रमाणे  अवस्था झाली आहे. कारण या बंधार्‍यातील ४० टक्के पाणी नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत करण्यात आले आहे. त्यामुळे डिग्रस परिसरातील शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी काढून तात्कालीन सत्ताधार्‍यांनी नांदेडकरांची सोय केली आहे, असा आरोप होत आहे.

गोदावरी नदीवरील धानोरा काळे येथील पुलाची उंची खुपच कमी असल्यामुळे येथे बॅक वॉटरचा साठा होत नाही. या पुलाची उंची वाढवावी, यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत. आता मात्र पुलाची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रसिद्ध केल्या असून यासाठीची १९ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. लवकरच या पुलाची उंची वाढविण्याचे काम सुरु होऊ शकते. पुलाची उंची वाढल्यास पाणीसाठा वाढेल आणि परिसरातील शेतकर्‍यांचा मोठा फायदा होईल. त्यामुळे त्वरित पुलाची उंची वाढविण्याचे काम चालू करुन ते पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी शेतकरीबांधवांनी केली आहे.