
सामना प्रतिनिधी। औराद शहाजानी
मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे औराद शहाजानी येथे पावसाचे पाणी जमा झाले आहे. यामुळे येथील सत्ताधाऱ्यांची पोल खोल झाली आहे. औराद शहाजानी येथे एकुण ६ वार्ड आहेत. मोठी तालुक्याची बाजारपेठ, आडत मार्केट, प्राथमीक आरोग्य केंद्र आणि वीस ते पंचवीस गावच्या लोकांच्या मदतीसाठी पोलीस ठाणे आहे. म्हणून या सीमावर्ती भागातील गावाला फार मोठे महत्त्व असल्यामुळे दिवसभर दोन – तीन राज्यांचे लोक बरेचसे व्यवहार करण्यासाठी या औराद गावाला भेटी देत असतात.
येथील ग्रामपंचायतीला एक सरपंच आणि उपसरपंचासहीत एकूण १७ सदस्य आहेत. या ग्रामपंचायतीला विकास निधी म्हणून महाराष्ट्र शासनाकडुन जकात अनुदान म्हणून ३० ते ३५ लाख रुपये थेट ग्रामपंचायतीला जमा होतात. दोन वर्षापासून महाराष्ट्र शासनाने चौदावा वित्त आयोगातुन ५० ते ६० लाख रुपये थेट ग्रामपंचायतीला पंचवार्षिक आराखडा तयार करुन दिलेला आहे. पण अद्याप जनतेच्या मागणीनुसार शर्मा नगर, रामानुज कॉलनी, इंदीरा नगर, गणेश नगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, लिंगायत गल्ली, मार्केट यार्ड, मुख्य रस्ते या भागातील बरेचसे ठिकाणी नाले तुंबलेल्या स्थितीतच आहेत. तर काही ठिकाणी नालेच गायब झालेले आहेत. काही ठिकाणी अद्यापही नाले तयार करण्यात आलेले नाहीत. यामुळे आलेला निधी जातो कुठे हाच प्रश्न औराद नगरीतील लोकांना सतावत आहेत.
लातुरचे पालकमंत्री असलेले संभाजी पाटील निलंगेकर हे देखील औराद मधून उमेदवारी दाखल करुनच निवडणूक लढवून निवडून येऊन तीन वर्षे झाले. पण औराद अद्यापही त्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे येथील विकास खुंटला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील दोन राज्यांना जोडणारे दोन रस्ते पूर्णपणे खड्डेयुक्त झाल्यामुळे कर्नाटकातील लोक औराद येण्यासाठी भरपूर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही वेळा जीव मुठीत धरुन येत आहेत कारण कर्नाटकातील ५ ते ६ गावांचे लोकांचे उदरनिर्वाह फक्त औरादवर अवलंबूनच आहेत.
येथील रस्ते आणि नाले दुरुस्त न झाल्यामुळे या दोन दिवसांच्या पावसाने येथील प्रत्येक वार्डातील लोकांना चिखल आणि नाल्याचे घाण पाणी रस्त्यावर साचल्याने सर्दी, ताप, मलेरीया अशा रोगांना बळी पडावे लागत असल्याने नागरिकांत नाराजी आहे. गेल्या ५ ते १० वर्षांपासून रस्त्याची जैसे थे अवस्था आहे. घाणीमुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मंजूर होऊन आलेली कामेही निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे ते जास्त कालावधी पर्यंत टिकणार नाहीत. कोणत्यातरी नेत्यांनी जनतेच्या या समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.
summary…heavy rain in aurad-shahajani





























































