भाषासु मुख्या मधुरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप श्रीधर भट

श्रावण शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा संस्कृत भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. ज्ञानभाषा म्हणून गौरव केल्या जाणाऱया संस्कृत भाषेतील वाङ्मयाची व्याप्ती विशाल आहे. या भाषेत विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे आणि म्हणूनच संस्कृत शास्त्र्ासंपदेचे महत्त्व आपण जाणले पाहिजे.

सं स्कृत ही साधारणतः पाच ते दहा हजार वर्षांपूर्वीची भाषा आहे, हे सत्य आज जगाने मान्य केले आहे. संस्कृत भाषेला देववाणी, गिर्वाणवाणी इत्यादी नावे आहेत. प्राचीनकाळी संस्कृत शिकण्यासाठी गुरुकुल पद्धत होती. हीच परंपरा ब्रिटिशांनी खालसा केलेल्या संस्थानिकांनी कायम ठेवली. उदा. नागपूर येथील भोसला संस्कृत वेदशास्त्र्ा महाविद्यालय, त्रावणकोर संस्थानात संस्कृत ही मॅट्रिकपर्यंत अनिवार्य भाषा होती. त्यामुळे तेथील हिंदूंबरोबर मुस्लिम व ख्रिस्ती विद्यार्थ्यांना पण संस्कृत शिकावे लागले. आज इंग्लिश ही भाषा जशी अभिजनांची आहे तशीच संस्कृत भाषा ही दोन-तीनशे वर्षांपूर्वी अभिजनांची संवादाची व साहित्य लेखनाची भाषा होती.

हिंदुस्थानातील सर्व भाषा संस्कृतप्रचुर आहेत. अपवाद तमिळ भाषा. इंडो-युरोपिअन भाषांमध्ये संस्कृतचा प्रत्यक्ष प्रभाव दिसतो. उदा. फारसीमधील अनेक शब्द संस्कृतसारख्या उच्चारांचे व अर्थाचे आहेत. उदा. हलाहल (विष), मूषक (उंदीर), माष (उडीद) इत्यादी आहेत. संस्कृत शिकण्यासाठी व्याकरण शिकणे अनिवार्य आहे हा संस्कृत विद्वानांचा-पंडितांचा दुराग्रह आहे. व्यावहारिक संस्कृत शिकण्यासाठी व्याकरण अनिवार्य असू शकत नाही. आजही संस्कृतमध्ये संपूर्ण दैनिक व्यवहार करणारी काही गावे आहेत. येथे दुकानदार, दूधवाले, भाजीवाले, ऑटोवाले इत्यादी संस्कृतमध्ये बोलतात. मुत्तूर, जि. शिमोगा, (बंगळूरूपासून 108 कि.मी. दूर) कर्नाटक राज्य आणि मोहदा, झिरी, धारवाड नगर, मध्य प्रदेश ही ती गावे होत.

ऑक्सफर्ड युनिव्हसिटीत ‘school of oriential studies’ हा एक विभाग आहे. यात संस्कृतसाठी एक वेगळी इमारत आहे. ‘या इमारतीचे अनावरण इंग्लंडचा राजा एडवर्ड आठवा याने केले’ असे संस्कृतमध्ये चार श्लोकांमध्ये कोनशिलेवर कोरले आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज 1908 साली इंग्लंडला गेले असताना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे त्यांना सन्माननीय डी. लिट देण्यात आली. दीक्षांत समारोहाचे संचलन व पदवीप्रदान लॅटीन भाषेत तयार आहे असे जेव्हा महाराजांना समजले तेव्हा त्यांनी आभाराचे भाषण संस्कृतमध्ये केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संस्कृतचे विद्वान होते. त्यांचे संस्कृतचे मार्गदर्शक व गुरू मुंबई विश्वविद्यालयाचे कुलगुरू भारतरत्न पा.वा. काणे होते. डॉ. आंबेडकर केंद्रीय विधिमंत्री असताना त्यांनी 13 सप्टेंबर 1949 ला संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी म्हणून एक ठराव लोकसभेत मांडला तोही संस्कृतमधूनच. या ठरावास सय्यद नजमुद्दीन अहमद सोबतच इतर दहा सदस्यांनी संस्कृतमध्येच भाषण करून पाठिंबा दिला, पण शेडय़ुल कास्ट फेडरेशनचे सचिव बी.पी. मौर्य यांनी ठरावास विरोध केला. कारण संस्कृत ही केवळ उच्चवर्णीयांचीच भाषा आहे अशी त्यांची पक्की धारणा होती. त्यामुळे राष्ट्रभाषा संस्कृतऐवजी राजभाषा संस्कृत अशी सुधारणा करून ठराव पारित झाला. आज देशातील सर्वच अधिकृत 22 भाषा राष्ट्रभाषा म्हणून गणल्या जातात. पुढे मौर्य यांनी संस्कृतला विरोध केल्याबद्दल पश्चात्ताप झाला. पं. नेहरूंनीही संस्कृत भाषा ही हिंदुस्थानी इतिहासाची प्रदीर्घ काळात संस्कृती, ज्ञानसाधना व मुत्सद्देगिरी यांची भाषा होती, असे म्हटले आहे. श्रीमती इंदिरा गांधी या लालबहाद्दूर शास्त्री हे पंतप्रधान असताना केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री होत्या. त्यांच्याच काळात संस्कृतमध्ये सकाळी 6.55 व संध्याकाळी 6.55 ला बातम्या देणे सुरू होते.

संस्कृतभारती या संस्थेने संस्कृत-ग्राम तयार करण्याचा संकल्प केला आहे. आमच्या मुलांची मातृभाषा संस्कृत असेल असा संकल्प केलेली 2500 घरे देशात आहेत. इ.स. 2007 मध्ये युनेस्कोने ऋग्वेदाला जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. आज देशात अनेक ठिकाणी केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालये आहेत. जगातील 25 देशांमधील 450 विश्वविद्यालयांत संस्कृत शिक्षणाची सोय आहे. आजही पाच हजार पारंपरिक पाठशाला आहेत. 12वीपर्यंत संस्कृत विषय घेणारे तीन कोटी विद्यार्थी आहेत. संस्कृतमध्ये दोन हजार मूळ धातू आहेत. त्यापासून धातू उपसर्म, संधी संस्कृत भाषेमध्ये सहजता, संक्षिप्तता, सुरक्षिता व सुरेलता आहेत. त्यामुळे अनेक नवे शब्द तयार होतात. 1957 साली केंद्र सरकारतर्फे संस्कृत आयुक्त व आयुक्तालयाचीही स्थापना झाली.

थोर गणितज्ञ भास्कराचार्यांनी खगोलशास्त्रीवर ग्रंथ लिहिले आहेत. सूर्य हा स्थिर असून पृथ्वी त्याच्याभोवती फिरते, हा सिद्धांत त्यांनी इ.स. 800 मध्ये मांडला. भास्कराचार्यांची कन्या लीलावती ही देखील तिच्या वडिलांप्रमाणे गणितज्ञ होती. संस्कृतची विविध विषयावरची पुस्तके, ग्रंथ सर्वच संस्कृत पुस्तकांचे, ग्रंथांचे तसेच ताडपत्रावरती लिहिलेले ग्रंथ पण आहेत. हे सर्व ग्रंथ तंजावूर, तामीळनाडू येथील ‘सरस्वती पुस्तक महल’ या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. स्वा. सावरकरांनी भाषा शुद्धीसाठी अनेक संस्कृत शब्द मराठीत आणले. उदा. महापौर, सचिव, सभापती, कुलगुरू, कुलपती इ. शब्द प्रचलित होऊन स्वीकारले गेले आहेत.

संस्कृतचे प्रकांड पंडित डॉ. रघुवीर हे International Academy of Indian culture या संस्थेचे अध्यक्ष होते. या संस्थेन अनेक उत्तम ग्रंथांची निर्मिती केली आहे. डॉ. रघुवीर यांचे चिरंजीव प्रा. लोकेश चंद्र हेदेखील एक संस्कृत विद्वान होते. राज्यघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या मूळ इंग्रजी राज्यघटनेचे भाषांतर करण्याची जबाबदारी डॉ. रघुवीर यांच्यावरच सोपवली होती. राज्यघटनेचा संस्कृत, तमीळ, उर्दू, असमी, हिंदी, कानडी, मल्याळम, उडीया, पंजाबी या तेरा भाषेत त्या त्या भाषेतील विद्वानांनी अनुवाद केला. बावीस हिंदुस्थानी राष्ट्रभाषांत संविधानाचे भाषांतर झाले आहे.

संस्कृत ही कालबाहय़ भाषा आहे असा चुकीचा प्रचार व प्रसार लॉड मेकॉले याने जाणीवपूर्वक सुरू केला. कारण ब्रिटिशांनी इंग्रजीचे महत्त्व वाढवायचे होते. कोणती भाषा मरत नसते. ती जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अशा प्रयत्नांची पराकाष्ठा यहुदी (ज्यू) बांधवांनी केली व हिब्रू भाषेला दोन हजार वर्षे जगवले. याचप्रमाणे संस्कृत भाषेलाही जपले गेले पाहिजे. संस्कृत भाषेमध्ये ज्ञान-विज्ञानाच्या सर्व शाखेचे प्रचंड भंडार आहे, पण ही भाषा इंग्लिशप्रमाणे रोजीरोटीची भाषा, भाकरीची भाषा जागतिक पातळीवर होणे अवघड आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

hamibhavache

– [email protected]