
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पुढच्या महिन्यापासून फ्लेक्सी फेअर स्कीममध्ये रेल्वे प्रशासन बदल करण्याची शक्यता आहे. कमी प्रवासी संख्या असणाऱ्या मार्गांवर ही योजना बंद ठेवण्याबाबतही विचार करण्यात येत आहे. सध्या या योजनेतंर्गत प्रिमियम ट्रेनमध्ये टिकीट आरक्षित करताना प्रवाशांना अनेकदा विमान तिकिटापेक्षा जास्त पैसे भरावे लागतात. त्यामुळे प्रवासी संख्या कमी होत आहे. प्रवाशांना रेल्वेकडे आकर्षित करण्यासाठी या योजनेत बदल करण्यात येणार आहे.
काही रेल्वे गाड्यांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण होत आहे. प्रायोगिक तत्वावर अशा ट्रेनमध्ये सिजन नसताना ही योजना काही काळ बंद करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. हमसफर ट्रेनप्रमाणे या योजनेत बदल करण्याबाबतही विचार करण्यात येत आहे. यात सुरुवातीचे ५० टक्के तिकीटे एक्सप्रेस आणि मेलच्या थर्ड एसीच्या मूळ किंमतीपेक्षा १५ टक्के जास्त किंमतीला विकण्यात येतात. तसेच १० टक्के तिकिटे बुक झाल्यावर हा स्लॅब वाढत जातो.
कमी प्रवासीसंख्या असलेल्या मार्गांवर विशेष सूट देण्याचाही सरकारचा विचार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. फ्लेक्सी फेअरवरून कॅगने रेल्वे प्रशासनाला नुकतेच फटकारले होते. १२० दिवसांपुर्वी बुकिंग केल्यास १७ मार्गांवर रेल्वेपेक्षा हवाई प्रवास स्वस्त असल्याचे कॅगने म्हटले होते. सध्या राजधानी, शताब्दी आणि दुरांतो ट्रेनमध्ये फ्लेक्सी फेअर योजना लागू आहे. या ट्रेनमध्ये ठरलेल्या मर्यादेपर्यंत तिकिटविक्री झाल्यानंतर दरात वाढ करण्यात येते. १० टक्के तिकिटविक्री झाल्यानंतर दरही १० टक्क्यांनी वाढवण्यात येतो. या ट्रेनमध्ये ९ सप्टेंबर २०१६ पासून ही योजना लागू करण्यात आली आहे.


























































