सिंधू जल करार; हिंदुस्थान- पाकिस्तानदरम्यान होणार चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सिंधू जल कराराबाबत हिंदुस्थान आणि पाकिस्तानात वाद आहेत. हा वाद चर्चेने सोडवण्यासाठी दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानात इम्रान खान यांचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा ही समस्या सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याचे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणत्याही मुद्द्यावर निष्पक्ष आणि सकारात्मक वातावरणात चर्चा करणे अशक्य आहे, या हिंदुस्थानच्या धोरणामुळे चर्चेतून काय साध्य होणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी घेतलेला पुढाकारही महत्वाचा आहे. सिंधू जलकराराच्या पालनासाठी ही चर्चा महत्वाची असल्याचे हिंदुस्थानने म्हटले आहे. तर किशनगंगासारख्या हिंदुस्थानच्या विकासकामांमुळे कराराचे उल्लंघन होत असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.

1947 मध्ये देशाच्या फाळणीनंतर दोन्ही देशांमध्ये नद्यांच्या पाणीवाटपावरून वाद सुरू झाले. हा वाद संपवण्यासाठी सिंधू करार करण्यात आला. 19 सप्टेंबर 1960 मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सहा नद्याच्या पाणीवाटपाबाबत हा करार आहे. या नद्यांतील 80 टक्के पाणी पाकिस्तानला जाते. तर 20 टक्के पाणी हिंदुस्थान वापरू शकतो. व्यास,रावी आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी हिंदुस्थानला देण्यात आले आहे. तर सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले आहे. तसेच हिंदुस्थान या नद्यांमधील 36 लाख एकर परिसरासाठी पाण्याचा साठा करू शकतो.

या कराराच्या पालनाबाबत होणारी चर्चा निष्फळ ठरल्यास दोन्ही देशांची आंतरराष्ट्रीय स्तारवर नाचक्की होणार आहे. दोन्ही देशांना पूराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसेच इतर देशांशी जलकरार करण्यातही अडचणी येणार आहेत. त्यामुळे याबाबत सामंजस्याने तोडगा काढण्याचे दोन्ही देशांचे प्रयत्न आहेत. इस्लामाबादमध्ये पुढील आठवड्यात दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. हिंदुस्थानी पथकाचे नेतृत्व पी. के. सक्सेना करणार आहेत. तर पाकिस्तानकडून सय्यद मेहरअली शाह पथकाचे नेतृत्व करतील. याआधी 2017 मध्ये या करारावर दोन्ही देशामध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देणे थांबवत नाही, तोपर्यंत चर्चा न करण्याचे धोरण हिंदुस्थानने स्वीकारले होते.

हिंदुस्थान आपल्या वाट्याचे 20 टक्के पाणी वापरत नसून पाणीसाठाही करत नाही. त्यामुळे हे पाणी वापरण्यासाठी सरकारने जलविद्युत प्रकल्प आणि जलसाठा करण्यासाठी प्रकल्प उभे करण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पांमुळे या कराराचे उल्लंघन होत असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र, आपल्या वाट्याचे सर्व पाणी वापरण्यासाठी सरकारने विविध योजनांना प्राधान्य दिले आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने हिंदुस्थान या नदीचे पाणी अडवून आपली कोंडी करेल अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. मात्र, आपल्या वाट्याचे पाणी वापरण्याचा आणि विकास करण्याचा आपला उद्देश असल्याचे हिंदुस्थानने स्पष्ट केले आहे. त्यामुळे करारातील कोणत्याही अटींचे उल्लंघन होत नसल्याचे हिंदुस्थानचे म्हणणे आहे. त्यामुळे हा वाद सोडवण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे.