
सामना ऑनलाईन । मुंबई
दैनंदिन बसपास काढण्यासाठी यापुढे प्रवाशांना आरएफआयडी स्मार्टकार्ड दाखवावे लागणार नाही. रविवार व सार्वजनिक सुट्टीप्रमाणे आता इतर दिवशीही बेस्ट बसेसमधून फिरायला जाताना स्मार्टकार्ड किंवा व आरएफआयडी कार्ड या ओळखपत्राची दैनंदिन बसपाससाठी गरज नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे स्मार्टकार्ड नाही त्यांनाही या सुविधेचा लाभ मिळू शकणार आहे.
बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी आरएफआयडी स्मार्टकार्डवर आधारित बसपास योजना आणली होती. त्यामध्ये दैनंदिन बसपास, मासिक, त्रैमासिक मॅजिक बसपास तसेच किलोमीटर्सवर आधारित मासिक व त्रैमासिक बसपास यांचा समावेश आहे. एकत्र कुटुंब बेस्टने प्रवास करत असल्यास सगळय़ांना आरएफ आयडी कार्ड व स्मार्टकार्ड देणे बेस्टला शक्य होत नसल्यामुळे अशा प्रवाशांना बसपास सुविधेपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे स्मार्टकार्ड दाखवण्याची अट शिथिल करण्यात आली होती. आता ओळखपत्राची अट काढल्याने प्रवासी संख्या वाढेल असा बेस्टला विश्वास आहे.























































