इम्रानला पळवून नेण्याचा कट रचणाऱ्या ११ जणांना पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

सिरियल किलर इम्रान मेहंदीला न्यायालयातून पळवून नेण्याचा कट रचून फौजदारावर पिस्तूल रोखून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेने ११ जणांना अटक केली. त्या ११ जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी मंगळवार, १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख हे गस्त घालताना चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील नारेगाव रस्त्यावर जय लहुजी चौकात सापळा रचून सरूफ खान शकूर खान (५०, रा. महाराज खेडी, घलटाका चौकी, ता. कसरावत, जि. खरगोन मध्य प्रदेश), नफीस खान ऊर्फ मेवाती मकसूद खान (४०, रा. गोगावा, शहापूर, बिडी मोहल्ला, ता. गोगावा, जि. खरगोन, मध्य प्रदेश), नकीब मोहमद नियाजू मोहंमद (५५, रा. निमरानी, ता. कसरावत, टाकारवळ चौकी, जि. खरगोन, मध्य प्रदेश), फरीद खान मन्सूर खान (३५, रा. अकबरपूर फाटा, ता. कसरावत, जि. खरगोन, मध्य प्रदेश), शब्बीर खान समद खान (३२, रा. रजानगर, ता. धरमपुरी, जि. धार, मध्य प्रदेश), फैजल खान गणी खान (३७, रा. खडकवाणी, ता. कसरावत, जि. खरगोन, मध्य प्रदेश), शाकीर खान कुर्बान खान (४०, रा. बलखड, ता. कसरावत, जि. खरगोन, मध्य प्रदेश), शेख यासेर शेख कादर (२३, रा. कौसरपार्क, नारेगाव, संभाजीनगर), सय्यद फैसल सय्यद एजाज (१८, रा. किलेअर्क काला दरवाजा, संभाजीनगर), मोहम्मद नासेर मोहम्मद फारुख (२६, रा. चंपाचौक, मुजीब कॉलनी, संभाजीनगर), मोहम्मद शोएब मोहम्मद सादेक (२८, रा. नाहेदनगर, बाबर कॉलनी, संभाजीनगर) या ११ आरोपींना २८ ऑगस्ट रोजी अटक करून पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले.

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ए. एच. जारवाल आणि सहायक सरकारी वकील एन.ए. ताडेवाड यांनी न्यायालयास विनंती केली की, आरोपींना अटक करून गुन्ह्यासंबंधी विचारपूस केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देतात, ते मध्य प्रदेशातून संभाजीनगरला कधी आले, कोणकोणत्या स्थानिक आरोपींना भेटून गुन्ह्याचा कट रचला, पिस्तूल कोठून आणले याबाबत चौकशी करावयाची आहे. आरोपींचे संभाजीनगरात कोण साथीदार आहेत, गुन्ह्याचा कट कोणासोबत, कोठे व कधी रचला, इम्रान मेहंदीच्या साथीदारांना पिस्टल पुरविले आहे काय, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांच्या मालकीबाबत दस्तऐवज हस्तगत करावयाचे आहेत. आरोपींकडे खाली काडतूसचे ‘केस’ आढळले, त्याचा वापर त्यांनी कोणाविरुद्ध व कधी केला याचा तपास करण्यासाठी आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती त्यांनी केला.

बचाव पक्षातर्फे आरोपी सय्यद फैसलकरिता युक्तिवाद करताना अ‍ॅड. अशोक ठाकरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, पोलिसांना आधीपासूनच माहिती होती. त्यांनी आरोपींना अटक करून शस्त्र जप्त केले आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीची गरज नाही. शिवाय केवळ पिस्टल मिळाले म्हणून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०७ आणि १०९ खाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी कोणावरही जीवघेणा हल्ला केला नाही. सबब, प्रस्तुत गुन्ह्यात वरील कलम लागू होत नाहीत. पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक बंद केल्यामुळे तेथे असलेल्या फैसलला संशयावरून पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी केवळ कारणे नव्हे तर स्पष्टीकरण द्यावे, असे उच्च न्यायालयाने अनेक आदेशात म्हटले आहे. आदी मुद्दे मांडून पैâसलला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ग्राह्य धरून त्या ११ जणांना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.